महापालिका अधिकाऱ्यांचे पथक पाहणी करणार; होटगी रोड एमआयडीमधील समस्या सुटणार !
By Appasaheb.patil | Published: March 14, 2023 03:17 PM2023-03-14T15:17:08+5:302023-03-14T15:17:20+5:30
हाेटगी राेड इंडस्ट्रियल इस्टेट ही जुनी औद्याेगिक वसाहत आहे.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : होटगी रोड औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, ड्रेनेज, लाईट व अन्य विविध समस्यांबाबतच्या अडचणी कारखानदार, उद्योजकांनी आयुक्तांसमोर मांडल्या. त्यानंतर आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार आज दुपारी चार नंतर महापालिकेच्या नगरअभियंता कार्यालयातील अधिकारी होटगी रोड एमआयडीसीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर एमआयडीसीमधील समस्या सुटणार असल्याचे सांगण्यात आले.
हाेटगी राेड इंडस्ट्रियल इस्टेट ही जुनी औद्याेगिक वसाहत आहे. या वसाहतीमधील कारखानदार पालिकेला कर देतात. अलीकडच्या काळात या ठिकाणी विविध कंपन्यांचे शाेरूम्स झाली आहेत. जगाच्या बाजारपेठेत चर्चेत असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू येथे तयार हाेतात. कारखाने, शाेरूम्स, वस्तू खरेदीसाठी देशाच्या विविध भागांतील लाेक या ठिकाणी येतात. या एमआयडीसीमध्ये येण्यासाठी औद्याेगिक पाेलिस चाैकी ते आसरा चाैक यादरम्यान चार रस्ते आहेत. अंतर्गत रस्तेही आहेत. या सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे आहेत. खडी पसरलेली असते. यातून धुळीचे लाेट येतात. कामगार, उद्याेजक आणि बाहेरून येणारे लाेक वैतागलेले असतात.
दरम्यान, अशा एक ना अनेक समस्यांबाबत कारखानदारांनी आयुक्तांसमोर अडचणी सांगितल्या. त्यानंतर नगरअभियंता कार्यालयास संबंधित परिसराची पाहणी करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार २५ टक्के महापालिका व ७५ टक्के उद्याेग भवनाचा निधी वापरात आणून या भागातील रस्ते करण्यात येतील सांगितले. याचवेळी उद्योजकांनी थकीत टॅक्सचा भरणा करावा असेही आयुक्तांनी आवाहन केले.