सैराट मधील आर्ची अन् परशाची आठवण देणार झाड होईल इतिहासजमा
By दिपक दुपारगुडे | Published: January 6, 2024 04:22 PM2024-01-06T16:22:21+5:302024-01-06T16:23:01+5:30
जेऊर (ता. करमाळा) येथील रहिवासी निर्माता दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी 'सैराट' या मराठी चित्रपटाची पाच वर्षांपूर्वी निर्मिती केली.
सोलापूर : ९६ पायऱ्यांच्या विहिरीजवळील दोन फांद्यांचे वाळलेले झाड कोसळण्याच्या अवस्थेत आहे. या लोकप्रिय वाळलेल्या झाडाला पाहण्यासाठी व सेल्फी काढून घेण्यासाठी हजारो पर्यटक व रसिक येत असतात. परंतु, या झाडाची अवस्था पाहून प्रेक्षकांतून निराशा व्यक्त होत आहे.
जेऊर (ता. करमाळा) येथील रहिवासी निर्माता दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी 'सैराट' या मराठी चित्रपटाची पाच वर्षांपूर्वी निर्मिती केली. सैराटमध्ये बस स्टँड, विश्रामगृह, सात नळाची विहीर, श्रीदेवीचा माळ येथील कमलादेवीचे मंदिर व सात नळाची विहीर, ९६ पायऱ्यांची विहीर, केम, कंदर, शेलगाव (वांगी), कुगाव, आदी स्थळं आहेत. बरोबरच ९६ पायऱ्यांच्या विहिरीजवळच असलेल्या दोन फांद्या असलेल्या वाळलेल्या झाडाच्या एका फांदीवर सैराट चित्रपटातील नायिका आर्ची व दुसऱ्या फांदीवर अभिनेता परशा बसून गाणे चित्रित केले आहे.
हे गाणे इतके गाजले की, प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. यानंतर राज्यभरातील प्रेक्षक या झाडाला भेटी देताहेत. या झाडावर बसून भोवताली उभे राहून सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.
आजही राज्यभरातून करमाळ्यात सैराट चित्रपटातील स्थळांना प्रेक्षक नियमित भेटी देताहेत. वाळल्यामुळे झाडाचे आकर्षण हळूहळू कमी होत आहे. या झाडाच्या खोडाला उभी भेग पडत चालली आहे. एक वाळलेली फांदी गेल्या वर्षी तुटून पडली, तर बुंधा मोकळा होत चाचला आहे. हे वाळलेले झाड कधी कोसळेल सांगता येत नाही. सैराटमधील अर्ची व परशाची आठवण करवून देणारे झाड वाळून कोसळण्याच्या मार्गावर असल्याने रसिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.