जिल्हासंपर्क पदासाठी सावंत-पाटलांमध्ये रस्सीखेच, मुंबईच्या बैठकीत वादाची ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 03:28 PM2022-08-08T15:28:20+5:302022-08-08T15:29:27+5:30
जिल्ह्याचे नेतृत्व कोण करणार? : मुंबईतील बैठकीत वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा
सोलापूर : शिवसेना उध्दव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची, यावरुन राज्यात वाद सुरू आहे. यादरम्यान शिंदे गटाचा जिल्ह्यातील नेता काेण, जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपद कोणाकडे असावे, यावरुन वाद सुरू झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा संपर्क प्रमुखपदासाठी आमदार डॉ. तानाजी सावंत, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गटातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे.
जिल्हा शिवसेनेतील एक गट फुटून शिंदे गटात सामील झाला. आता शिंदे गटात आमदार डॉ. तानाजी सावंत, आमदार शहाजीबापू पाटील असे मुख्य गट कार्यरत असल्याचे दिसून येते. मागील आठवड्यात मुंबईमध्ये माजी मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी राज्यातील कार्यकर्त्यांची जिल्हानिहाय बैठक झाली. या बैठकीत सोलापूरचे नेतृत्व कुणाकडे असावे, यावरुन वाद झाल्याची चर्चा आहे. माढा, सांगोल्यातून गेलेल्या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्याऐवजी इतराकंडे संपर्कप्रमुख किंवा नेतृत्व असावे, असा सूर लावला. या बैठकीनंतर सोलापुरात माढ्याचे प्रा. शिवाजी सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीला माढ्याचे संजय कोकाटे आणि कार्यकर्ते, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील गटाचे कार्यकर्ते, मोहोळचे सोमेश क्षीरसागर आणि कार्यकर्ते, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील गटाचे कार्यकर्ते अनुपस्थित होते. सेनेचे माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील हे शिंदे आणि सावंत गटाचे महत्त्वाचे शिलेदार मानले जातात. खासगी कामामुळे ते बैठकीला अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले. परंतु, ठोंगे-पाटील यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली.
पहिली ठिणगी सांगोल्यातून, दुसरी मोहोळमधून
शिवसेना कुणाची, हा वाद न्यायालयात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून माढ्याचे संजय कोकाटे यांचे नाव यापूर्वीच निवडणूक आयोगाला कळविण्यात आले आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख, एक शहरप्रमुख असला तरी शिंदे गटाचा एक शहरप्रमुख, एक सोलापूर लाेकसभा आणि एक माढा लोकसभा प्रमुख असावा असे माढा, मोहोळ, सांगोला, कुर्डूवाडी, पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सांगोल्यातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत निरोपही पोहोचिवला आहे. पण आता सावंत गटाने चार जिल्हाप्रमुख नेमायची तयारी केली आहे. मोहोळमध्ये क्षीरसागर गटाला डावलून जिल्हाप्रमुख ठरविण्यात आले आहे.