घरी फराळाची ऑफर अन् गाडीतून लिफ्ट; सोलापूरातील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात महिलेची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 11:40 AM2022-11-10T11:40:09+5:302022-11-10T11:42:30+5:30
मानसिक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आत्महत्या करावी लागेल असे या आशयाचे निनावी पत्र एका शिक्षिकेने जिल्हा परिषदेला मिळाले आहे.
सोलापूर- सोलापूर जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याच्या विरोधात एका महिलेने निनावी पत्र पाठवून तक्रार केली आहे. अधिकाऱ्याने दिवाळीला फराळासाठी बोलविले तसेच गाडीतून लिफ्ट देण्याची विचारणा केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मानसिक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
शाळेत आल्यावर अधिकाऱ्याने वाईट नजरेने बघू नये, वर्गातून बाहेर बोलावू नये, मोबाईल नंबर मागू नये, गाडीत सोडतो म्हणू नये, मला सांभाळतो अशा शब्दांचा वापर करू नये, याची दक्षता घ्यावी अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. मानसिक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आत्महत्या करावी लागेल असे या आशयाचे निनावी पत्र एका शिक्षिकेने जिल्हा परिषदेला मिळाले आहे.
या पत्राची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व माजी विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनाही देण्यात आले आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत संबंधितांवर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री १९ नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या किंवा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गाडीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा पत्रात देण्यात आला आहे.
बदनामीच्या पत्राबद्दल लोहारांकडे पूर्वीच पत्र जमा
माझ्या बदनामीचा प्रयत्न होणार असल्याचे पत्र मी यापूर्वी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना दिले होते. माझ्यावर आरोप करणाऱ्या पत्राची दखल घेऊ नये अशी विनंती त्या पत्रात केली होती. ज्या लोकांची बेकायदेशीर कामे झाले नाहीत. त्या लोकांनीच माझ्या बदनामीचा कट रचला आहे. याबाबत मी शिक्षणाधिकारी यांना पूर्वकल्पना दिली होती, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. याबाबत सीईओची भेट घेणार असून या प्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलेचा जबाब घेऊन कारवाई करु- स्वामी
जिल्हा परिषदेत आलेल्या पत्राबद्दल पत्रकारांशी बोलताना सीईओ दिलीप स्वामी म्हणाले, पत्र निनावी असले तरी त्याची दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याला याबाबत विचारणा करणार आहोत. त्यानंतर त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर संबंधित महिलेला काका साठे यांच्यासोबत बोलावून घेऊन त्या महिलेचा जबाब घेऊ. त्यानंतर पुढील कारवाई करू.