थांबा नसताना एक्सप्रेस थांबवून प्रसुतीवेदना होणाऱ्या महिलेला रुग्णालयात पोहोचवले; तिने गोडस मुलीला दिला जन्म
By Appasaheb.patil | Published: December 28, 2022 04:38 PM2022-12-28T16:38:04+5:302022-12-28T16:39:09+5:30
तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या माणुसकीच्या दर्शनाने सर्वच भारावले.
सोलापूर : पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत थांबा नसलेली राजकोट एक्सप्रेस कुर्डूवाडी स्थानकावर थांबविली. यानंतर एका महिलेला सुखरूपपणे डब्यातून उतरावले अणि वेळेत रूग्णालयात पोहोचवले. यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या माणुसकीच्या दर्शनाने सर्वच भारावले.
सविस्तर वृत्त असे की, २७ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ८.४८ वाजता कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यास माहिती मिळाली. गाडी नंबर २२७०८ राजकोट एक्सप्रेस कोच नंबर एस ५, सीट नंबर १० नंबरवरील महिला प्रवासी यांना प्रसुती वेदना होत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिस हवालदार एम.टी.माने, हवालदार प्रकाश जिराळ व पोलिस नाईक विकास भोसले यांनी स्टेशनवर जावून गाडीला थांबा नसताना ती थांबविण्यास भाग पाडले. तात्काळ त्या महिलेला गाडीतून खाली उतरावून ग्रामीण रूग्णालय, कुर्डूवाडी येथे दाखल केले. २७ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी त्या महिलेले गोंडस मुलीला जन्म दिला.
ही ही उत्कृष्ट कामगिरी कुर्डूवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एम.टी.माने, पोलिस हवालदार प्रकाश जिराळ व पोलिस नाईक विकास भोसले यांनी पार पाडली.
१५ मिनिटे एक्सप्रेस थांबली... -
राजकोट एक्सप्रेसला कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा नाही. ती थेट सोलापूर रेल्वे स्थानकावरच थांबते. मात्र प्रसंगावधान राखत लोहमार्ग पोलिसांनी संबंधित रेल्वे यंत्रणेला कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर गाडी थांबविण्यास भाग पाडले. त्या महिलेच्या उपचारासाठी एक्सप्रेस १५ मिनिटे स्थानकावरच थांबली होती. त्यानंतर ती पुन्हा धावत पुढे गेली.
हैद्राबादच्या महिलेची कुर्डूवाडीत प्रसुती... -
रेल्वे प्रवासात असताना त्रास होत असल्याने मुळची हैद्राबाद येथील रहिवासी असलेली रंजनीदेवी मंहातो ही महिला कुर्डूवाडी येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुत झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्यासोबत प्रवास करताना तिचे पती सुनिलकुमार मंहातो हे उपस्थित होते. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे सर्वांनी लोहमार्ग पोलिसांचे अभिनंदन करून कौतुक केले.