महिला न्यायाधीशांनी कोर्टाच्या प्रवेशद्वासमोर दिला दिव्यांग व्हीलचेअरवरील महिलेला न्याय
By विलास जळकोटकर | Published: June 7, 2023 09:33 PM2023-06-07T21:33:51+5:302023-06-07T21:34:00+5:30
मोटार अपघात खटला मध्यस्थीनं मिटवला, रोख अन् धनादेशानं भरपाई
सोलापूर : लोकशाहीच्या प्रमूख स्तंभापैकी एक असलेल्या न्यायमंदिरात बुधवारी एक सुखद घटना घडली. जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांनी चक्क न्यायपीठावरुन उतरुन न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन मोटार अपघातातील खटला मध्यस्थीनं निकाली काढला. व्हीलचेअवरील असहाय्य महिलेला २ लाख ६० हजार रुपयांची मदत मिळवून दिली.
न्यायमंदिरणातील अशी दुर्मिळ घटना सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये घडली. त्याचे असे झाले, सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात अर्जदार मंन्चली विरुद्ध समाधान रासकर हा मोटार अपघातातील नुकसानभरपाईचा अर्ज (१४७/ २०२२) जिल्हा न्यायाधीश आय.ए. नझीर यांच्या न्यायालयामध्ये प्रलंबित होता. न्यायालयाने मध्यस्थीसाठी सदरचा अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे सोपविला होता.
या प्रकरणाचे स्वरुप लक्षात घेता तो १० फेब्रुवारी २०२२ रोजी घडलेल्या अपघाताशी निगडीत होता. हा अपघात कुर्डू शिवारातील आदीलक्ष्मी मंदिराजवळ सकाळी ९ च्या सुमारास घडला होता. या घटनेमध्ये वाहनचालकाने अर्जदार मंन्चली या तिच्या पतीसमवेत दुचाकीवरुन प्रवास करीत होत्या. यात टँकरचालकाने धडक दिली. यामुळे अर्जदार मंन्चली यांच्या पायाला गंभीर जखम होऊन त्यांना अपंगत्व आले.
या प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा दाखल होता. वैद्यकीय उपचारानंतर मंन्चली यांनी कायदेशीर सल्लागारामार्फत नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी मध्यस्थीसाठी जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांच्याकडे वर्ग केला. अर्जदार व टँकरचालक यांच्यात मध्यस्थी घडवून तडजोडीची रक्कम न्यायालयासमोरील प्रवेशद्वारासमोर दिव्यांग महिलेला दिली. ही दुर्मिळ घटना सोलापूरच्या न्यायालयात वकील, पक्षकारांनी अनुभवली. या प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे लिपिक सुनीता चोपडे, विजय माळवदकर, सचिन वडतिले, रहिम शेख यांनी सहकार्य केले.
चर्चेत मध्यथी ठरली यशस्वी
या प्रकरणात अर्जदार मंन्चली त्यांचे वकील व्ही. आर. कोन्हाळे आणि टँकर मालक नागेश खटके उपस्थित होते. न्यायाधीशांनी उभयंतासमवेत मध्यस्थीसाठी मार्गदर्शन करुन तडजोडीचे प्रयत्न केले. चर्चेनंतर टँकरचालक आणि जखमी अर्जदार मंन्चली यांच्यात तडजोड केली आणि मध्यस्थी यशस्वी झाली.
अन् न्यायपीठावरुन प्रवेशद्वारासमोर आल्या
या चर्चेनंतर टँकरचालकाने लागलीच तडजोडीच्या रकमेचा धनादेश २ लाखाचा धनादेश आणि रोख ६० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. अर्जदारानेही तयारी दर्शविली. अर्जदार या व्हीलचेअरवर असल्याने मध्यस्थीची ही प्रक्रिया जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर पार पडली. जिल्हा न्यायाधीश पांढरे यांनी प्रकरणातील तथ्य आणि दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जाणून न्यायपीठावरुन उतरुन न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर आल्या आणि तडजोडीची रक्कम व धनादेश त्यांच्या उपस्थितीत व्हीलचेअरवरील महिलेला प्रदान केली.