सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम करताना खाली पडून सोलापुरातील तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 03:15 PM2022-02-28T15:15:41+5:302022-02-28T15:15:47+5:30
कचरा डेपो येथील प्रकार : कॉन्ट्रॅक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल
सोलापूर : तुळजापूर रोडवरील बायो एनर्जी कंपनी, कचरा डेपो येथे नवीन सीसीटीव्ही कॅमेरा बसवत असताना पत्र्यातून खाली पडल्याने तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हा दुर्दैवी प्रकार शनिवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी कॉन्ट्रॅक्टरसह दोघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर बायो एनर्जी कंपनी, कॉन्ट्रॅक्टर सुहास कुलकर्णी (सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तुळजापूर रोडवरील बायो एनर्जी कंपनीच्या कचरा डेपोमध्ये नवीन सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे कॉन्ट्रॅक्ट सुहास कुलकर्णी यांना देण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे काम मयत अजय सोपान गायकवाड (वय २३ रा. शिंगोली, पोस्ट तिऱ्हे ता. मोहोळ), त्याचा मित्र ऋत्विक दंतकाळे, तेजस दंतकाळे व अभिलाष स्वामी करत होते. कॅमेरा बसवण्यासाठी चौघे सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास बायो एनर्जी कंपनीत गेले होते. ४० फूट उंच असलेल्या पत्र्याच्या शेडवर कॅमेरा बसवण्यासाठी आकाश गायकवाड चढला होता, तेथे प्लास्टिकचा पत्रा होता, त्यावर थांबला होता. काम सुरू असताना अचानक पत्रा फाटला अन तो खाली जमिनीवर पडल्याने, गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आकाश गायकवाड याला काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा देण्यात आली नव्हती. सुरक्षा बेल्ट अथवा त्यांना चढणे उतरणेकरीता शिडी किंवा पायऱ्याची सोय करण्यात आली नव्हती. जॅकेट व हेल्मेट न दिल्यास कर्मचाऱ्याचा जीव जाऊ शकतो अशी माहिती असतानाही काम करण्यास भाग पाडण्यात आले होते. आकाशच्या मृत्यूस सोलापूर बायो एनर्जी कंपनी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर जवाबदार असल्याची फिर्याद भाऊ अजय सोपान गायकवाड (वय २८ शिंगोली पो. तिऱ्हे ता. मोहोळ) यांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत.
आठ महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
० मयत आकाश गायकवाड याच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. घरी आई असून त्याचे लग्न आठ महिन्यापूर्वी झाले होते. भाऊ अजय गायकवाड हा पुणे येथे कामाला आहे. त्यामुळे तो सध्या आई व पत्नी यांच्यासमवेत रहात होता. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम तो करत होता, मात्र योग्य सुरक्षा न दिल्याने त्याचा जीव गेला. या दुर्दैवी प्रकारामुळे शिंगोली, तिऱ्हें परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.