मटका, जुगार आणि...: सगळ्या व्यसनांची माहिती पत्नीला दिली; सोलापुरात रागातून तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 16:30 IST2025-03-15T16:16:58+5:302025-03-15T16:30:17+5:30
काही दिवसांपूर्वी मयत नागेश याने आरोपी अभिषेकच्या पत्नीला अभिषेक हा मटका खेळतो, जुगार खेळतो, बाईचे लफडे करतो असे सांगितले होते.

मटका, जुगार आणि...: सगळ्या व्यसनांची माहिती पत्नीला दिली; सोलापुरात रागातून तरुणाचा खून
Solapur Crime : व्यसनाची माहिती पत्नीला सांगितल्याचा राग मनात धरून तरुणाला हातोडीच्या लाकडी दांडक्याने मारून खून केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. नागेश संतोष विटकर (वय २०, रा. महालक्ष्मी झोपडपट्टी, भवानी पेठ) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृताची आई लिंबुबाई संतोष विटकर (वय ३५, रा. भवदनी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक अंबादास विटकर (रा. जुना घरकुल), अविनाश अंबादास बंदपट्टे (रा. महालक्ष्मी झोपडपट्टी, भवानी पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी मयत नागेश याने आरोपी अभिषेकच्या पत्नीला अभिषेक हा मटका खेळतो, जुगार खेळतो, बाईचे लफडे करतो असे सांगितले होते. या कारणामुळे आरोपीच्या कुटुंबात वाद झाले होते. या प्रकरणाचा राग मनात धरून आरोपी अभिषेक याने १२ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मयत नागेश यास दंडुक्याने गंभीर मारहाण केले. यात तो रक्तबंबाळ अवस्थेत तेथे पडला.
ही घटना फिर्यादी लिंबुबाई यांना कळाल्यानंतर त्यांनी लगेच नागेश याला रिक्षातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान नागेशचा मृत्यू झाला, अशा आशयाची फिर्याद लिंबुबाई विटकर यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण करत आहेत.
आरोपींना पोलिस कोठडी
दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना शुक्रवारी कोर्टासमोर हजर केल्यानंतर आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.