पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात
By विलास जळकोटकर | Published: December 28, 2023 07:46 PM2023-12-28T19:46:12+5:302023-12-28T19:46:39+5:30
त्याला पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी प्रसारमाध्यास सांगितले.
सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरुवारच्या सोलापूर दौऱ्यामध्ये नियोजन भवनात जिल्हा नियोजन बैठक आयोजित केली होती. ही बैठक आटोपून पालकमंत्री निघून गेले. त्यानंतर एका तरुणाने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी पकडून ताब्यात घेतले असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी प्रसारमाध्यास सांगितले.
पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता दादासो बबन कळसाई (वय ३६, रा. टाकळी टें. ता. माढा) असे त्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले. आत्मदहनाचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला विचारले असता त्याने सांगितले की, सन २०१९ मध्ये आमदार बबन शिंदे यांच्या आमदार निधीतून टाकळी गावात व्यायामशाळा बांधण्यासाठी ७ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. सदरचे पैसे ठेकेदार जाधव व शाखा अभियंता निकम, उपअभियंता खरात, कार्यकारी अभियंता माने यांनी मंजूर पैसे उचलून गावामध्ये व्यायाम शाळा न बांधता सदर पैशाचा आभार केला. याबद्दल लेखी अर्ज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच दोन ते तीन वेळा आंदोलन करूनदेखील कारवाई झाली नाही. त्यांच्यावर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा नियोजन कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे सदर तरुणाने सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
सदर तरुणाला पुढील कारवाई करण्यासाठी सदर बजार पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.