अबब...१५ तासांनंतर १५० फूट खोल विहिरीतून काढला कोल्हा बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:51 PM2019-04-04T14:51:30+5:302019-04-04T14:53:34+5:30
पंढरपूर वनविभागाची कामगिरी : दोरी व जाळीच्या साहाय्याने वाचविला जीव
पंढरपूर : रांझणी (ता. पंढरपूर) येथे १ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता १५० फूट खोल विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभाग व अॅनिमल राहतच्या पथकाला १५ तासांनी विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.
रांझणी (ता. पंढरपूर) येथील महादेव आप्पा घोडके यांच्या शेतात १५० फूट विहीर आहे. यामध्ये ५० फूट खोल पाणी आहे, तर १०० फूट मोकळे होते. तसेच महादेव घोडके यांच्या शेताजवळ मेंढ्या देखील होत्या. यामुळे कोल्हा त्या परिसरात आला होता. त्याला समोर विहीर असल्याचे जाणवले नाही. यामुळे कोल्हा विहिरीत पडला. याबाबतची माहिती शेतकरी महादेव आप्पा घोडके व नवनाथ लोंढे यांनी उपवनसंरक्षक विलास पोवळे यांना फोनवरून सांगितली.
पोवळे हे तत्काळ वनमंडल अधिकारी एस. व्ही. पाटील व अन्य कर्मचाºयांना घेऊन रांझणी येथे गेले. मात्र त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्री नसल्याने ते माघारी आले. दुसºया दिवशी मंगळवारी वनविभागाचे वनमंडळ अधिकारी एस. व्ही. पाटील, वनसेवक बाळासाहेब शेख, महादेव चव्हाण, अतुल सावंत, शकील मणेरी, युवराज काळे व अॅनिमल राहतचे माधव अनंत पवार घटनास्थळी पोहोचले.
दोरीच्या साहाय्याने वनसेवक अतुल सावंत व माधव अनंत पवार हे विहिरीत उतरले. कोल्ह्यावर जाळी टाकून त्याला बाहेर काढले. कोल्ह्याला अनेक ठिकाणी किरकोळ इजा झाल्या होत्या. तसेच १५ तास अन्न न मिळाल्याने कोल्हा थकलेला होता. त्यामुळे कोल्ह्यावर उपचार करून सोडून देण्यात आले असल्याची माहिती वनमंडळ अधिकारी एस. व्ही. पाटील यांनी सांगितली.