आला गुढीपाडवा; साखर हारांची मागणी वाढली; सोलापुरातील व्यापाऱ्यांचा होणार पाडवा गोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:05 PM2021-04-09T13:05:44+5:302021-04-09T13:05:49+5:30
गुढीपाडव्याचे मार्केट : बाबूंची खरेदी मात्र घटली; साडी विक्री नाहीच
सोलापूर : गुढीपाडवा पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाला साखरेच्या हारांची विशेष मागणी असते. गतवर्षी संचारबंदीमुळे साखर हारांची विक्री झाली नाही; पण यंदा या हारांची बाजारात मागणी वाढल्यामुळे व्यापारी अन् कारखानदारांसाठी नवीन वर्षारंभाचा हा सण गोड होणार आहे.
प्रतिवर्षी साखरेचे हार ७० ते ८० रुपये किलो दराने विकले जातात. यंदा व्यापाऱ्यांकडून साखर हारांची मागणी कमी झाल्यामुळे यंदा दरात थोडी वाढ पाहायला मिळत आहे. गुढीला घालण्यासाठी नवीन साडी खरेदी केली जाते; पण यंदा लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. त्यामुळे साडीचे व्यापारी निराश दिसून आले.
प्रतिवर्षी गुढीपाडव्यासाठी आठवडाभरापासून बांबूंची खरेदी होते; पण यंदा पाच दिवसांत असे येऊनही फक्त दहा टक्के बांबूची विक्री झाली आहे. यामुळे आम्हाला याचा मोठा फटका बसत आहे. दरवर्षी जवळपास २०० पेक्षा जास्त बांबू विकले जातात. यंदा मात्र दहा ते वीस बांबूंची विक्री झाली आहे. यंदा दरामध्ये दहा टक्के वाढ झालेली आहे, असे बांबू विक्रेता मनोज वडतिले यांनी सांगितले.
यंदा १५ क्विंटल हारांची निर्मिती
जेवढ्या ऑर्डर आम्हाला मिळतात, तेवढेच आम्ही हार तयार करत आहोत. यंदा प्रशासकीय नियमानुसार शनिवार, रविवार व्यवसाय बंद असल्यामुळे या दिवशी खरेदी होणार नाही आणि मंगळवारी सण असल्यामुळे सोमवारी एका दिवसात जास्त हारांची विक्री होणार नाही. प्रती वर्षी आम्ही जवळपास ४० क्विंटलपर्यंत साखरेचे हार बनवितो. यंदा मात्र पंधरा क्विंटल साखरेचे हार आम्ही बनविलेले आहेत, असे कारखानदार प्रकाश सिद्धे यांनी सांगितले.
आता ऑर्डर्स वाढताहेत!
मागील एक ते दीड महिन्यापासून साखरेच्या हाराला व्यापाऱ्यांकडून खूप कमी मागणी होती; पण मागील दोन ते तीन दिवसांपासून ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. यामुळे व्यवसायात आम्हाला उत्साह येत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत जवळपास ४० टक्के व्यापाऱ्यांनी ऑर्डरस् दिल्या आहेत.
- धीरज खैरमोडे, व्यापारी