आषाढी यात्रा ; विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मिळाले २.९० कोटीचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 02:49 PM2018-07-30T14:49:40+5:302018-07-30T14:52:25+5:30
सचिन कांबळे
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त लाखो वारकºयांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या चरणावर दान अर्पण केल्यामुळे मंदिर समितीला यंदाच्या आषाढी यात्रेत २ कोटी ९० लाख ४४ हजार ६४१ रुपयांचे उत्पन्न मिळाले असल्याची मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपुरात आषाढी यात्रेनिमित्त येणाºया भाविकांना मंदिर समितीने उत्तम प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यामुळे भाविकांनी स्वत:कडून सत्कार्य व्हावे, यासाठी मंदिर समितीला विविध स्वरुपाने दान केले आहे.
या देणगी उत्पन्नामध्ये श्री विठ्ठलाच्या चरणावर ३६ लाख ३७ हजार ५०९ रुपये तर रुक्मिणी मातेच्या चरणावर ६ लाख ९३ हजार ६२४ रुपये, अन्नछत्र देणगी ११ हजार ९५५, पावती स्वरुपातील देणगी १ कोटी ६० लाख १२ हजार ५५० रुपये, बुंदी लाडूप्रसाद विक्रीतून ५० लाख ३८ हजार ४७० रुपये, राजगिरा लाडू विक्रीतून ५ लाख ६४ हजार ५०० रुपये, फोटो विक्रीतून ९५ हजार ४७५ रुपये, भक्तनिवास, वेदांन्ता, व्हिडीओकॉन भक्त निवासाच्या माध्यमातून ३ लाख १६ हजार ६०५ रुपये, नित्यपूजा १ लाख ५० हजार रुपये, हुंडीपेटीमध्ये जमा झालेली रक्कम १८ लाख ९२ हजार २२२ रुपये, आॅनलाईन देणगीच्या माध्यमातून २ लाख ९ हजार ८६२ रुपए व अन्य स्वरुपात ४ लाख २१ हजार ८६९ रुपयांचा समावेश आहे. हे सर्व उत्पन्न ३० जुलैपर्यंतचे आहे. यामुळे यात्रा संपल्यानंतर देखील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येणाºया भाविकांची संख्या जादा असते. यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मागील वषीर्पेक्षा २१.५० लाख जादा
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीस यंदाच्या आषाढी यात्रेत विविध स्वरुपातून २ कोटी ९० लाख ४४ हजार ६४१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत २ कोटी ६८ लाख ९६ हजार ५१४ रुपये इतके उत्पन्न मंदिर समितीस मिळाले होते. यामुळे मंदिर समितीला मागील वर्षीच्या तुलनेने २१ लाख ४८ हजार १२७ रुपयांचे जादा उत्पन्न प्राप्त झाले असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
१७ लाख भाविकांनी घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
या आषाढी यात्रा कालावधीत ११ लाख इतक्या भाविकांनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले. व ७ लाख भाविकांनी विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेतले. असे एकूण १७ लाख भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.