अबब..! सोलापुरातील पाणी गिरणीतून निघाला ५०० ट्रक गाळ, अजूनही काम बाकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 04:33 PM2021-11-09T16:33:30+5:302021-11-09T16:33:33+5:30
नागरिकांच्या जिवाशी खेळ : लाेकांना पाजले गलिच्छ पाणी; कडक कारवाईची मागणी
साेलापूर : महापालिकेच्या रूपाभवानी पाणी गिरणीतून गेल्या १२ दिवसांत ५०० हून अधिक ट्रक गाळ काढण्यात आला. अद्याप निम्मे काम बाकी आहे. दरम्यान, पाणी गिरणीच्या स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यानंतर आणखी अधिकाऱ्यांवर कारवाई हाेईल, असा इशारा आयुक्त पी. शिवशंकर यांनी साेमवारी दिला.
ऑक्टाेबर महिन्यात भवानी पेठ, घाेंगडे वस्ती भागातील नळांना सलग तीन ते चार वेळा पिवळसर पाणी आले. पाण्याला वास येत हाेता. यामुळे गाेंधळ उडाला. नगरसेवक सुरेश पाटील आणि कार्यकर्त्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली. या भागाला रूपाभवानी जलशुध्दीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जाताे. या केंद्रातील पाणी शुध्दीकरणाच्या हाैदाची स्वच्छता झाली नसल्याचा प्रकार समाेर आला. एका हाैदात माेठ्या प्रमाणावर गाळ हाेता. दुर्गंधी सुटली हाेती. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समाेर आले. त्यामुळे आयुक्तांनी दाेन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. गेली १२ दिवस एका हाैदाची स्वच्छता सुरू आहे. या हाैदातील तीन बेड्सपैकी एका बेडची स्वच्छता झाली. यातून सुमारे ५०० ट्रक गाळ निघाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी दाेन हाैदांची स्वच्छता बाकी आहे. आणखी गाळ निघण्याची शक्यता आहे. आयुक्तांनी केवळ एक-दाेन साध्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. वरिष्ठांचे दुर्लक्ष झाल्यामुळेच हा प्रकार घडला असून, त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली आहे.
---
काय घडला प्रकार?
रूपाभवानी जलशुध्दीकरण केंद्रात दाेन माेठ्या हाैदात तुरटीची मात्रा देऊन पाणी शुध्दीकरणाची प्रक्रिया हाेते. दाेन हाैदात भिंती टाकून बेड तयार केले आहेत. या बेड्समध्ये गाळ साचला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी या हाैदांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. गाळ साचून पाणी गलिच्छ झाले. हेच पाणी लाेकांना पिण्यासाठी साेडण्यात येत हाेते. नगरसेवकांच्या तक्रारीनंतर हा प्रकार समाेर आला.