अबब... रानमसलेत पन्नास फूट खोल विहिरीत उतरून साळिंदरला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 01:48 PM2022-01-21T13:48:39+5:302022-01-21T13:48:47+5:30
रॅपलिंगचा आधार : डब्ल्यूसीएची कामगिरी
सोलापूर : रानमसले येथील एका ५० फूट खोल विहिरीत साळिंदर पडल्यामुळे वाइल्ड कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी डब्ल्यूसीए) रॅपलिंगच्या साह्याने विहिरीत उतरून साळिंदरला बाहेर काढले आणि नैसर्गिक आवासात सोडून दिले.
प्रभाकर गायकवाड यांनी रानमसले येथील शेतकरी प्रकाश दिवटे यांच्या शेतातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी एक साळिंदर पडल्याची माहिती सुरेश क्षीरसागर यांना दिली. एक तासाच्या प्रवासानंतर शेतकरी दिवटे यांच्या शेतात टीम डब्ल्यूसीएचे सदस्य पोहोचले. प्रसंगावधान राखून सुरेश क्षीरसागर यांना हारनेसच्या साहाय्याने रॅपलिंग करून विहिरीत उतरवले.
खाली उतरूनसुद्धा साळिंदर पूर्ण विहिरीत कधी पाण्यात तर कधी पाण्याबाहेर असा लपंडाव खेळत असल्यामुळे सर्वांची दमछाक झाली होती. पकडण्याचा प्रयत्न केला की, शेपटीकडील काट्यांची ढाल सामोरे करून तो संरक्षक पवित्रा घेत होता. शेवटी, साळिंदरला एका कोपऱ्यात व्यवस्थित ट्रॅप करून पिंजऱ्यात घालण्यात त्यांना यश आले.
याबाबत नान्नज विभागाला माहिती देऊन त्याची नोंद घेण्यात आली. जवळच त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडून देण्यात आले. या बचावकार्यात अजित चौहान, काशिनाथ धनशेट्टी व रत्नाकर हिरेमठ यांनी सहभाग घेतला. माळढोक पक्षी अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जावळे, ललिता बडे, अशोक फडतरे आणि वनमजूर सुधीर गवळी यांनी सहकार्य केले.