अबब...सोलापुरात आढळला ‘स्केल लेस कोबरा’ नावाचा नाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:44 AM2020-01-03T11:44:54+5:302020-01-03T11:47:04+5:30
शरीरावर खवले युक्त त्वचाच नसल्याने सर्पमित्रांनी व्यक्त केले आश्चर्च..!
सोलापूर : साप म्हणजे अंगावर खवले व सरसर करत जमिनीवर धावणारा विना हाताचा व विना पायाचा प्राणी़ सोलापुरात आढळणारा विषारी जातीचा म्हणजे नाग, घोणस, फुरसे, मण्यार व कधीतरी आढळणारा पवळा साप; मात्र सोलापूर शहर-परिसरात असा नाग आढळून आला त्याच्यावर खवलेच नव्हते. त्याची त्वचा जणू गुळगुळीत व स्वच्छ होती. त्याचे नाव आहे स्केल लेस कोबरा.
दरम्यान, शहर व परिसरात विविध प्रकारचे साप आढळून येतात़ स्केल लेस कोबरा सापडल्याने सर्पमित्रांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे़ ज्यावेळी हा साप सापडला तेव्हा सुरुवातीस वाटले हा अल्बिनो असावा. नंतर कळले हा अल्बिनो नसून वेगळाच जीवन जगणारा सर्प आहे.
सोलापूर शहरातील सोनी नगर परिसरात हा स्केल लेस कोबरा आढळून आला़ गुरुराज कानडे यांची वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य प्रवीण जेऊरे व सिद्राम कोळी यांना फोन आला. एक साप आमच्या घराच्या परिसरात असल्याचा निरोप आला़ हा निरोप मिळताच सर्पमित्रांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन कानडे यांच्या घराशेजारची पाहणी केली. त्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर त्या नागास पकडले. यानंतर याबाबतची माहिती सोलापूर वनविभागास दिली.
नागावर कोणत्याच प्रकारची त्वचा (स्केल) दिसत नव्हती. सुरुवातीला वाटले हा अल्बिनो असावा पण तो पूर्णपणे पांढरा नव्हता. सर्प अभ्यासकाशी संपर्क साधला असता कळले की असे साप खूपच दुर्मिळ असतात. शरीरावर खवले युक्त त्वचाच नाही. जणू हा साप निसर्गाचे सर्वच नियम डावलणारा आहे. तत्काळ वनविभागाने हा कोबरा निसर्गात सोडून दिला.