गृहमंत्र्यांनी घेतली दखल अन् अपहरण झालेला मुलगा ३६ तासात आईच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:40 PM2020-12-19T12:40:43+5:302020-12-19T12:40:56+5:30
सोलापूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या फोननंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्री एक वर्षाच्या मुलाचा अपहरणाचा गुन्हा दाखल ...
सोलापूर : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या फोननंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्री एक वर्षाच्या मुलाचा अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. त्यानंतर ३६ तासांच्या आतच मुलाचा शोध पोलिसांनी लावला आहे. दरम्यान, मुलाला आईच्या ताब्यात देण्यात आले असून, आरोपी मात्र अद्यापपर्यंत फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुबशीरीन म़ मुस्तफा पठाण (वय २९, रा़ सन्मतीनगर, माढा, सध्या लोकमान्य नगर) यांचे त्यांच्या पतीशी पटत नसल्याने त्या आपला एक वर्षाचा मुलगा इस्माईल सोबत सोलापुरात आपल्या बहिणीकडे राहण्यास आल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी मुबशीरीन यांचे पती मुस्तफा पठाण यांच्या सोबत आलेला चुलत दीर जिलानी मुजावर याने इस्माईल याला बाहेर खेळवतो, असे सांगून घरातून न सांगता घेऊन गेल्याची फिर्याद मुबशीरीन यांनी दिली. ही फिर्याद दाखल होताच पोलीस पथक माढा येथे मध्यरात्रीच रवाना झाले.
दरम्यान, आरोपी जिलानीने मुलाला फिर्यादी महिलेचा पती मुस्तफा याच्या स्वाधीन केले. त्यानंतर तो फरार झाला.त्यानंतर शुक्रवारी मुस्तफाने मुलगा आपल्या ताब्यात असलेला फोटो पोलिसांना पाठविला. पोलिसांनी मुलाला आपल्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर मुस्तफा यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलाला विजापूर नाका पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, सायंकाळी इस्माईलला आईच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती फिर्यादीच्या नातेवाईकांनी दिली. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.