अब्दुल सत्तारांनी वारकऱ्यांना घातले साकडे; काय आहे नेमकी बातमी ? वाचा सविस्तर
By Appasaheb.patil | Published: November 4, 2022 04:43 PM2022-11-04T16:43:32+5:302022-11-04T16:44:18+5:30
पंढरपुरात झाली प्रबोधनपर बैठक
सोलापूर/ पंढरपूर : वारकरी संप्रदायाने गावोगावी होणाऱ्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाद्वारे समाजाला जागृत करण्याचे काम केले. यामुळे समाजातील अनेकांचे संसार सुखी झाले आहेत. याच माध्यमातून शेतकऱ्यांचेही प्रबोधन केले तर शेतकरी कधीही आत्महत्या करणार नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत वारकरी संप्रदायातील वारकरी व फडकरी समवेत आयोजित प्रबोधनपर बैठकीत ते बोलत होते. संत तुकाराम भवन येथे आयोजित या बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकर, बापूसाहेब देहुकर, गणेश महाराज शिंदे, विठ्ठल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. एन. कांबळे, सर्जेराव तळेकर यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, वारकरी, फडकरी यांच्या प्रत्येक शब्दाला समाजात मान असून, समाजाला भजन, कीर्तनाच्या माध्यमातून जागृत करण्याचे काम ते करतात. शेत पिकांमुळे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला तर आत्महत्त्या हा पर्याय नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचे मंत्री आहेत. मागील आठवड्यात नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध विकास योजना आणत आहे, शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेवून तसेच विविध आधुनिक कृषि तंत्राचा वापर करून आपली प्रगती करावी. शेतकरी आत्महत्या करणार नाही, याबाबत वारकरी, फडकरी यांनी पुढाकार घेऊन समाज प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून, राज्य व केंद्र सरकारकडून भरीव मदत करण्यात येणार आहे. नुकसानीची अंतिम आकडेवारी चार दिवसात हाती येईल. ३३ टक्के पाऊस झाला असेल त्या ठिकाणचा देखील पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतीसाठी १२ तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. निसर्गाच्या लहरीपणामुळे नैसर्गिक संकटे आली तर योग्य नुकसान भरपाई देऊ, कृषि मालाला चांगला व योग्य दर देण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
बापूसाहेब देहूकर म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची नाही, हे संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. समुद्राचे पाणी वाढत नाही, दुष्काळ पडला म्हणून कमी होत नाही, हे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावे. परंतु, परिस्थिती शेतकऱ्यांना हतबल करते, त्यामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतो. सध्याचे शासन हे शेतकऱ्यांची काळजी घेणारे शासन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.