लोकांमध्ये दहशत पसरवून खंडणी मागणाऱ्या अभिजित बंडगरची येरवडा तुरुंगात रवानगी

By विलास जळकोटकर | Published: December 23, 2023 06:53 PM2023-12-23T18:53:31+5:302023-12-23T18:54:11+5:30

सार्वजनिक शांततेसाठी वर्षभरात झाल्या १४ कारवाया

Abhijit Bandagar sent to Yerwada Jail for spreading terror among people and demanding ransom | लोकांमध्ये दहशत पसरवून खंडणी मागणाऱ्या अभिजित बंडगरची येरवडा तुरुंगात रवानगी

लोकांमध्ये दहशत पसरवून खंडणी मागणाऱ्या अभिजित बंडगरची येरवडा तुरुंगात रवानगी

विलास जळकोटकर, सोलापूर: लोकांमध्ये दहशत पसवून त्यांना वेठीस धरुन खंडणीची मागणी करणे, घातक शस्त्रांद्वारे हल्ला करुन खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या अभिजित किसन उर्फ रेवण बंडगर याच्यावरविरुद्ध पोलीस आयुक्तांनी शनिवारी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध आदेशाची कारवाई केली. त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. वर्षभरात १४ कारवाया करण्यात आल्या.

यातील अभजित किसन उर्फ रेवण बंडगर हा गेल्या अनेक वर्षांपासून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी क्रांतीनगर, आमराई, वाय चौक,हब्बू वस्ती, जुना देगाव नाका, न्यू लक्ष्मी बाळ, पावण गणपती, बल्ला चाळ, दमाणी नगर, शेटे वस्ती, देशमुख पाटील वस्ती, मरिआई चौक परिसरात व्यापारी तसेच सामान्य नागरिकांनामध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर जमावाद्वारे खंडणी तसेच खुनाचा प्रयत्न अशी गंभीर गुन्हे करीत होता.

या प्रकाराबद्दल त्याला समज देऊनही त्याच्या गुन्हे कृत्यामध्ये बदल झाला नाही. त्यामुळे अशा कृत्याला पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे (परिमंडळ) यांच्यासह अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

फरक पडला नाही म्हणून कारवाई

यातील आरोपी अभिजित बंडगर याच्या विरोधात फौजदार चावडी पोोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी त्याला २०१६ मध्ये कलम १०७ अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई केली होती. मात्र त्याच्यामध्ये सुधारणा न झाल्याने एमपीडीएची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कारवाया सुरुच राहणार

पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सोलापूर शहरातील कार्यभार स्वीकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची १८ वी व या वर्षातील १४ वी कारवाई आहे. सार्वजनिक शांततेसाठी अशी कारवाई सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Abhijit Bandagar sent to Yerwada Jail for spreading terror among people and demanding ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.