जनतेच्या पैशाचे उधळपट्टी करणारा केंद्राचा 'मेरी माटी-मेरा देश' कार्यक्रम रद्द करा - पन्नालाल सुराणा
By संताजी शिंदे | Published: August 12, 2023 04:19 PM2023-08-12T16:19:40+5:302023-08-12T16:26:15+5:30
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा 'मेरी माटी मेरा देश' हा निरर्थक कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, अशी मागणी सोशलिस्ट पार्टीचे पन्नालाल सुराणा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
सोलापूर : जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा 'मेरी माटी मेरा देश' हा निरर्थक कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, अशी मागणी सोशलिस्ट पार्टीचे पन्नालाल सुराणा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सचिव यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये या कार्यक्रमाविषयी माहिती दिली आहे. हा कार्यक्रम ९ ऑगस्ट पासून पुढे १८ दिवस चालवला जाणार आहे. प्रत्येक गावात शिलाफलक लावण्यात येणार आहे. हे कार्यक्रम तालुका, जिल्हा व राज्याच्या प्रमुख सरकारी कार्यालयात राबविले जाणार आहेत. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी यात सहभागी व्हायचे आहे. नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. त्यावेळी स्वातंत्र्यवीरांना नमन करण्यात आले होते, मग लगेच 'मेरी माटी मेरा देश' या नावाने दीर्घ कार्यक्रम करण्यात काय औचित्य आहे.
खरे तर देशात मणीपुर मधील दोन समूहातील हिंसाचार, शेतकऱ्यांना लागणारे अनेक वस्तूंची जबर किंमत वाढ, रस्त्यावरील खड्डे असे अनेक ज्वलंत प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. त्याबाबत ठोस व परिणामकारक उपाय करण्याऐवजी लोकांचे लक्ष निरर्थक गोष्टीतून इतरत्र वळविण्याचा हा कार्यक्रम आहे. असा चले जाव चळवळीत भाग घेणाऱ्या माझ्यासारख्या अनेक नागरिकांना देशातील ही गंभीर परिस्थिती व वाढत चाललेली विषमता पाहून तीव्र वेदना होत आहेत. देशाच्या मातीचे नुकसान होऊ नये यासाठी 'माती आडवा, पाणी जिरवा' अशा कार्यक्रमावर आपण लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचेही पन्नालाल सुराणा यांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ विचारवंत दत्ता गायकवाड उपस्थित होते.