संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द करा, सकल मराठा समाजाची मागणी
By राकेश कदम | Updated: June 20, 2024 13:56 IST2024-06-20T13:56:36+5:302024-06-20T13:56:47+5:30
राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाच्या निर्णयाला हरताळ फासण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ही बाब लक्षात आली आहे.

संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द करा, सकल मराठा समाजाची मागणी
सोलापूर : राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवताना मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाच्या निर्णयाला हरताळ फासण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळे सरकारने आता केवळ सोलापूर नव्हे तर संपूर्ण राज्यातीलच अकरावीची प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणासह राबविण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वय माऊली पवार आणि प्रा. गणेश देशमुख यांनी गुरुवारी केली.
पवार म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी सोलापुरात होते. सकल मराठा समाजाच्या भेटीनंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले होते. आरक्षणाला हरताळ फासण्याचा प्रकार केवळ सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात घडल्याचे गुरुवारी आम्हाला फोनवरून अनेक समाज बांधवांनी कळवले. अनेक आरक्षणानुसार प्रवेश दिले जात नाहीत. भरमसाठ फी घेऊन समाज बांधवांना प्रवेश दिले जात आहे. ही समाज बांधवांची शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांनी राज्यातीलच प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश द्यावेत, असेही पवार म्हणाले.