अक्कलकोटमध्ये वादळवा-यात विजेचे २२२ खांब जमीनदोस्त
By काशिनाथ वाघमारे | Published: April 23, 2024 04:55 PM2024-04-23T16:55:53+5:302024-04-23T16:56:47+5:30
मागील पंधरा दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात होत असलेल्या वादळवाऱ्यात फळपिकांसह महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर : मागील पंधरा दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यात होत असलेल्या वादळवाऱ्यात फळपिकांसह महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. या पंधरा दिवसांत लघुदाब वाहिनीचे १४२, तर उच्च दाब वाहिनीचे ८० विद्युत खांब जमीनदोस्त झाले आहेत. याशिवाय ११ रोहित्र जळाले आहेत. तालुक्यातील वीजपुरवठा विस्कळीत झाला असून, १४० कर्मचारी व अधिकारी रात्रंदिवस धडपडत आहेत.
यंदा अवकाळी पाऊस, वादळीवाऱ्याचा मोठा फटका अक्कलकोट तालुक्यात बसला आहे. हन्नूर ते किणी भागात तीन ठिकाणी खांबावर वीज पडली आहे. अक्कलकोट ते हन्नूर या दोन ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत. अक्कलकोट-शिरवळ परिसरात चार ठिकाणी झाडं पडून तारा तुटल्या आहेत. अक्कलकोट- नागणसूर भागात ३३ केव्हीचा एक खांब तुटला आहे. अक्कलकोट-नागणसूर व अक्कलकोट-मिरजगी उपकेंद्रात सर्वाधिक बिघाड होत आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या सर्व अडचणीवर मात करीत एमएसईबीचे व कंत्राटी मिळून १४० कर्मचारी रात्रंदिवस काम करताहेत. उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे, शाखा अभियंता राजदीप कुलकर्णी, कैलास गिरी, सचिन माने, कुणाल माळवदे यांचे पथक वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत आहे.
दुधनीत सर्वाधिक पोल आडवे-
वागदरी शाखाअंतर्गत कमी दाबाचे ३१ खांब, तर उच्च दाबाचे १८ खांब जमीनदोस्त झाले आहेत. दुधनीत एलटीचे ३५, तर एचटीचे २० खांब, मैंदर्गीत एलटी २६, तर एचटी १२, नागणसूर परिसरात एलटीचे ११, तर एचटी २२, अक्कलकोट शहर एलटीचे २, तर ८० ठिकाणी तारा तुटलेल्या होत्या. दोन ट्रान्स्फर बंद पडले होते. तडवळमध्ये एलटीचे ७, तर एचटी ३ पोल आडवे झाले. करजगीत एलटीचे ९, तर एचटीचे ३, अक्कलकोट ग्रामीणमध्ये एलटीचे ८, हन्नूरमध्ये एलटी १३, तर एचटी २, अशा प्रकारे कमी दाबाचे (एलटी) चे १४२, तर उच्च दाब (एच टी) चे ८० विजेचे खांब आडवे झाले आहेत.