मुस्लीम आरक्षणासाठी ८५ हजार सह्यांचे निवेदन, सोलापूरचे आडम मास्तर राज्यपालांना भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:56 AM2018-10-16T10:56:44+5:302018-10-16T10:59:43+5:30
आडम राज्यपालांना भेटले : पाच टक्के राखीव जागांची मागणी
सोलापूर : राज्यातील मुस्लीम अल्पसंख्याकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी माकपाचे राज्य सचिव माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक अॅड. एम.एच.शेख, जिल्हा निमंत्रक युसूफ शेख (मेजर) या शिष्टमंडळाद्वारे राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी त्यांना ८५ हजार स्वाक्षºयांचे निवेदन देऊन चर्चा केली.
राज्यपालांसमोर मांडणी करताना आडम मास्तर म्हणाले, महाराष्ट्र शासनाने १९ जुलै २०१४ रोजी मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणासाठी अधिसूचना काढली. परंतु उच्च न्यायालयाने ही अधिसूचना फेटाळून लावत अंशकालीन ५ टक्के शैक्षणिक आरक्षण लागू ठेवावे, असा निर्णय दिला. परंतु या अधिसूचनेचे रुपांतर कायद्यात झाले नाही. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना नाईलाजाने शैक्षणिक संस्थांमध्ये लाखो रुपयांची फी भरून प्रलंबित निकाल घ्यावे लागले.
सध्या राज्यात मराठा व धनगर समाजाला आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. आंदोलनांच्या माध्यमातून राज्यात पडसाद उमटत आहेत. मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असताना मुस्लीम अल्पसंख्याक समाजालादेखील ५ टक्के आरक्षण देऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आंध्रप्रदेश आणि तेलंगणात मुस्लीम अल्पसंख्याकांना १० टक्के आरक्षण मिळत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही ५ टक्के आरक्षण देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
यावेळी राज्यपालांनी मुस्लीम अल्पसंख्याकांना शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यास राज्य शासनाला सूचना करणार असल्याची ग्वाही दिली.