पंढरपूरातील आषाढी एकादशीवर मराठा आंदोलनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 02:51 PM2018-07-22T14:51:58+5:302018-07-22T14:57:28+5:30
लाखो भाविक पंढरपूरात ; धनगर, कोळी, वारकरी संघटनाही आक्रमक, पोलिसांवर ताण
पंढरपूर : आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पंढरपुरात येत आहेत. मात्र, मराठा क्रांती मोर्चा, धनगर समाज अशा विविध संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वारीवर आंदोलनाचे सावट आहे. सरकारच्या मेगाभरतीत १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखून ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी तशी अधिसूचना काढण्याची मागणी मराठा मोर्चाने केली आहे.
आषाढी एकादशी सोमवारी असून, श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर या प्रमुख संतांच्या पालख्यांसह शेकडो दिंड्या व १० लाखांपेक्षा जास्त भाविकांचे पंढरपुरात आगमन होत आहे. मराठा मोर्चाने मुख्यमंत्र्यांनी अगोदर अधिसूचना काढूनच महापूजेसाठी यावे, असा पवित्रा घेतला आहे. धनगर समाज आरक्षणासाठी आग्रही आहे. कोळी समाजाने महादेव कोळी असा दाखला मिळाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विविध वारकरी संघटनांनी मंदिर समितीविरोधात पवित्रा घेतला आहे.
यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. वारकºयांची सुरक्षा व आंदोलकांचा बंदोबस्त ठेवण्यासाठी त्यांना सतर्क राहावे लागणार आहे. त्यामुळे एकूणच पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला आहे. आंदोलकांनी राज्यासह पंढरपुरातही काही ठिकाणी बस तोडफोड, पुतळ्याचे दहन करणे, चक्काजाम, ठिय्या आंदोलन असा पवित्रा घेतल्याने तणाव आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एसआरपीच्या तुकड्यांसह जादा पोलीस बंदोबस्त मागविला आहे.
६५ एकर परिसरात हरिनामाचा गजर
पंढरपूर : चंद्रभागा नदीच्या काठावरील ६५ एकर परिसऱ़़ ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात दिंड्यांचे आगमऩ़़ नोंदणी केलेल्या प्लॉटवर विसावा़़़ दिंडीतील काही वारकºयांची लागलीच राहुटी उभारण्याची लगबग़़़ ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘हरिनामाचा’ गजर सुरू केल्याचे चित्र शनिवारी पाहावयास मिळाले़.
चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन!
भंडीशेगाव : आळंदी ते पंढरपूर या प्रवासात विठुरायाच्या पंढरीत प्रवेश करण्यासाठी अवघा एक दिवस आणि सहा किलोमीटरचे अंतर उरले आहे. दर्शनाची आस पूर्ण होण्यासाठी आता अवघा काही तासांचाच अवधी उरला आहे.
मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी विरोध करणे उचित नाही.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री
पोलीस, वारकरी व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांमध्ये तणावाचे वातावरण आहे़ आषाढीत भाविकांना त्रास न देता सुरळीत पार पाडायची असेल, तर मुख्यमंत्र्यांनी महापूजेचा हट्ट सोडावा व आपला दौरा रद्द करावा.
- आ़ भारत भालके, काँग्रेस