बियाणे अन् खतांचा मुबलक साठा; पुरेशा पावसानंतर पेरणी करा, कृषी विभागाचे आवाहन
By Appasaheb.patil | Published: July 4, 2023 07:18 PM2023-07-04T19:18:47+5:302023-07-04T19:19:07+5:30
खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे.
सोलापूर : खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात २०.६० लाख हेक्टर म्हणजे १४ टक्के पेरणी झाली आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व खतांचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
चालू खरीप हंगामाकरिता राज्यास १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. राज्यासाठी १५ लाख ९२ हजार ४६६ क्विंटल म्हणजे ८२ टक्के बियाणे उपलब्ध झाली आहेत. खरीप हंगामासाठी ४३.१३ लाख मे.टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आत्तापर्यंत ४४.१२ लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी १६.५३ लाख मे.टन खतांची विक्री झाली असून सद्यस्थितीत राज्यात २७.५८ लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे.
राज्यात ३ जुलै पर्यंत १४०.९ मिमी. पाऊस झाला असून सरासरी पर्जन्यमानाच्या २३९.६ मिमी. म्हणजे ५८.८ टक्के इतका पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार बियाणांची व खतांची खरेदी करावी असे चव्हाण यांनी कळविले आहे.