पाण्याच्या निमित्तानं बालकेवर अत्याचार; आरोपी मजुरास २५ वर्षे सक्तमजुरी
By विलास जळकोटकर | Published: January 4, 2024 07:14 PM2024-01-04T19:14:06+5:302024-01-04T19:15:13+5:30
खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाकडून ४ साक्षीदार तपासण्यात आले.
सोलापूर : बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुणानं सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात न्यायालयापुढे सादर झालेल्या साक्षी, वैद्यकीय अहवाल, वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीशांनी सुनील सिद्राम म्हेत्रे (वय- २२, बापूजी नगर, सोलापूर) यास २५ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, या खटल्यातील आरोपी सुनील हा फिर्यादीच्या घराच्या बांधकामाचे ठेकेदाराकडे मजूर म्हणून कामास होता. घटनेदिवशी ४ जानेवारी २०२० रोजी पिडित सात वर्षाच्या बालिकेची आई घरामध्ये झोपलेली होती. आरोपीने पीडित बालिकेला पिण्यासाठी पाण मागितले. ती पाणी देण्यासाठी गेली असता आरोपीने तिला ‘तुला मोर दाखवतो’ असे म्हणून आत खोलीत जाऊन तिच्याशी लैंगिक अत्याचार केला.
सदरची बाब पीडितेने तिच्या आईला सांगितली असता फिर्यादीने आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली. तोपर्यंत आरोपी पळून गेला. त्यानंतर फिर्यादीने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास करुन तत्कालिन सपोनि तपासी अधिकारी एन. पी. साळुंखे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकिलांनी सदर आरोपीने अत्याचार केला असून, घटनास्थळावरुन आरोपी लगेच पळून गेला. लागलीच फिर्यादही देण्यात आली. वैद्यकीय अहवालानुसार सदर गुन्हा आरोपीने केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश जन्नू आरोपीतर्फे ॲड. फिरोज शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार प्यारन नदाफ यांनी काम पाहिले.
सरकार पक्षाचा युक्तीवाद
सरकारी वकील प्रकाश जन्नू यांनी युक्तीवाद मांडताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पिडितेवर अत्याचार झाल्याचा अहवाल दिला आहे. आरोपीने अमानुष कृत्य केले आहे. साक्षीपुराव्याच्या आधारे सिद्ध केल्याचे नमूद केले. हा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस २५ वर्षाची शिक्षा सुनावली.
चार साक्षीदार तपासले
खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाकडून ४ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी (पिडितेची आई), पिडिता, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
अशी सुनावली शिक्षा
न्यायालयाने आरोपीला दोषी धरुन भा. द. वि. कलम ३७६ (२) (आय), ३७६ ब (जे), ३५४ - अ तसेच बाललैंगिक अत्याचार कलम ४,८ अन्वये दोषी धरुन बाललैंगिक अत्याचार कलम ५ (एम) व ६ अन्वये २५ वर्षाची शिक्षा सुनावली.