सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेतील बाराबंदी शिवण्याच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:17 PM2019-12-14T12:17:08+5:302019-12-14T12:18:38+5:30
लहान मुलांसाठीही मागणी; महिनाभरात शिवले जाताहेत तीन हजारांवर पोशाख
सोलापूर : सिद्धेश्वर यात्रा उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. यात्रेतील भाविक रात्री उशिरापर्यंत आणि पहाटे उठून नंदीध्वज तोलण्याचा सराव करीत असून, नवीन बाराबंदी घेण्याचीही लगबग सुरू आहे. यात्रेतील हा पोशाख शिवण्याची कला असणाºया शहरातील टेलर्सकडे आता बाराबंदी शिवण्याच्या कामाला गती आली असून, डिसेंबरच्या संपूर्ण महिन्यात त्यांना तीन हजारांवर यात्रेचे गणवेश शिवायचे असल्याने रात्रीचा दिवस करून शिलाई मशीनची चाके फिरविली जात आहेत. अलीकडील काळात लहान मुलांसाठीही हौसेखातर बाराबंदी घेतली जाते. टेलर्सना चिमुकल्या भक्तांचा पोशाख शिवण्याचेही नवीन काम करावे लागत आहे.
सिद्धरामेश्वर यात्रेला आठशे वर्षांची परंपरा आहे. त्यावेळी मिरवणुकीत सहभागी भक्तगण बाराबंदीचा पोशाख नेसत असत. हा इतिहासकालीन पोशाख यात्रेच्या परंपरेसोबत आजही मोठ्या उत्साहात भक्तगण घालून सहभागी होतात. सिद्धरामेश्वरांच्या जीवनचरित्रातील श्री मल्लिकार्जुन आणि बालसिद्धेश्वर या गुरू-शिष्य भेटीच्या चित्रात बाराबंदी दाखविण्यात आले आहे. यावरून समकालीन पोशाख बाराबंदी होती याला पुष्टी मिळते. असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या पोशाखाचे आबालवृद्धांना आकर्षण आहे. ते घालून यात्रेत सहभागी होण्याची सर्वच भक्तांची इच्छा असते.
बाराबंदीसह चार कपड्यांचा संच असून त्यामध्ये धोतर, नेहरू शर्ट, डोक्यावर बांधण्यात येणारा रुमाल यांचा समावेश असतो. यात्रेतील चार-पाच दिवस वापरला जाणारा हा पोशाख वर्षभर सांभाळून ठेवला जातो. आकाराने लहान होत असल्यास चार-पाच वर्षाला एकदा नवीन शिवला जातो. मिरवणुकीत चार हजार बाराबंदीधारक सहभागी होतात. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात्रेत पहिल्यांदा हा पोशाख नेसणाºया भक्तांमध्ये लहान मुले आणि कॉलेज युवकांचे प्रमाण मोठे आहे. धोतर व फेटा बांधण्यातील अडचणीमुळे तयार पोशाखात सहभागी होण्याकडे यांचा कल आहे.
एक महिन्याच्या बाळापासून ते वृद्धापर्यंत सर्व आकारात बाराबंदीचे पोशाख उपलब्ध आहेत. वर्षभरात दोन ते अडीच हजार बाराबंदी तयार करण्यात येतात. मागणीनुसार मागील पंधरा दिवसांपासून पंधरा शिलाई मशीनवर ड्रेस शिवण्याचे काम चालू आहे. यामध्ये लहान मुलांच्या ड्रेसला हौसेखातर जास्त मागणी आहे. महाविद्यालयीन युवक व यात्रेत पहिल्यांदा नेसणाºया भक्तगण, धोतर व डोक्यावरील रुमाल बांधण्याच्या अडचणीमुळे रेडिमेडला जास्त पसंत करत आहेत, असे उत्पादक संजय महाजन यांनी सांगितले. लहान मुलांचे ड्रेस पाचशे रुपये तर मोठ्या भक्तांचे अठराशे रुपयांना आहेत.
छातीवर बारा बंद, म्हणून बाराबंदी.....
- पूर्णत: सुती कापडाचा वापर करण्यात येणाºया बाराबंदीला पाच मीटर कापड लागते. त्यासोबतच नेहरू शर्टला तीन मीटर, धोतर चार मीटर, रुमाल चार मीटर एकूण सोळा मीटर कापड लागते. बाराबंदी नेसल्यानंतर ते घट्ट बांधून ठेवण्यासाठी त्याला बारा बंद असतात म्हणून या वस्त्राला बाराबंदी असे संबोधले जाते. एक बाराबंदी शिवण्यासाठी आठ ते दहा तास लागतात. शहरातील सर्व कारागीर हे तेलुगू भाषिक आहेत.