तीन हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूरच्या पोलीस हवालदारास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 05:19 PM2018-05-23T17:19:08+5:302018-05-23T17:19:08+5:30
सोलापूर : दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये इतर कारवाई न करता फक्त सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस देण्याकरिता पोलीस हवालदार विजयकुमार ननवरे (पंढरपूर शहर पोलीस ठाणे) यास ३ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़
तक्रारदार यांच्याविरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणे, सोलापूर येथे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला होता़ सदर अदखलपात्र गुन्हामध्ये तक्रारदार यांच्याविरूध्द इतर कारवाई न करता फक्त सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस देण्यासाठी पोलीस हवालदार विजयकुमार ननवरे हे १० हजार रूपयाची लाच मागत असल्याबाबत तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे दिली होती़
त्यानुसार २३ मे २०१८ रोजी तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली त्यात तक्रारदार यांनी पोलीस हवालदार ननवरे यांची पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे जावून समक्ष भेट घेवून कामाचा विषय काढला असता ननवरे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरूध्द दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये इतर कारवाई न करता फक्त सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस देण्यासाठी ३ हजार रूपये लाचेची मागणी केली़ त्यावरून २३ मे २०१८ रोजी ननवरे यांच्याविरूध्द पंढरपूर शहर पोलीस कार्यालयात सापळा लावला होता़ त्यावेळी ३ हजार रूपयांची लाच स्वीकारताना विजयकुमार विठ्ठल ननवरे (वय ४८ ) यांना रंगेहाथ पकडले़
सदरची सापळा कारवाई पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़