अकोले बु येथे अपघात, दोन युवक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:24 PM2018-05-11T12:24:47+5:302018-05-11T12:24:47+5:30
जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बराच वेळ ते दोघेही अपघातस्थळी पडून होते
पंढरपूर/टेंभुर्णी : टेंभुर्णी-पंढरपूर रोडवरील अकोले बु. (ता. माढा) येथे कार व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वाखरी (ता. पंढरपूर) येथील दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना वाखरी परिसरात घडली.
सागर शरद माने (वय २६) आणि त्याचा मित्र सुहास दादासाहेब शिंदे (वय २८, दोघे रा. वाखरी, ता. पंढरपूर) अशी अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. सागर शरद माने व सुहास शिंदे हे दोघे त्यांच्याकडील मोटरसायकल (क्र. एम. एच. १३/ सी.डब्लू. १४७८) वरून पंढरपूरला निघाले होते. ते अकोले बु. येथे आले असता त्यांच्या मोटरसायकलला समोरून येणाºया कार (क्र. एम.एच. १३/ ए.झेड. ८९१६)ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात माने हा जागीच ठार झाला तर शिंदे हा अकलूजकडे उपचारास घेऊन जाताना वाटेत मयत झाला. अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. दिलीप केंगार व पोकॉ. भोये यांनी घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
अपघाताची फिर्याद सुरेश ज्ञानेश्वर माने यांनी दिली असून, कारचालक रणजित राजू बुधनेर (रा. नारायण चिंचोली, ता. पंढरपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ. दिलीप केंगार करीत आहेत.
उपचाराला विलंब
- जखमींना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. बराच वेळ ते दोघेही अपघातस्थळी पडून होते. यानंतर त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. सागर शरद माने व सुहास शिंदे हे दोघे शेतीविषयक औषधांच्या कंपनीत काम करीत होते.