राष्ट्रसेवा समूहाकडून लेखी पत्राद्वारे उजनी आंदाेलकांना साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:02+5:302021-05-21T04:23:02+5:30
भीमानगर : उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचे नियोजन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले होते. या निर्णयाला विरोध ...
भीमानगर : उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचे नियोजन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले होते. या निर्णयाला विरोध म्हणून उजनी धरणावर काही संघटना आंदाेलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रसेवा समूहाचे प्रवक्ते योगेश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून आपली साथ असल्याचा लेखी पाठिंबा दिला.
जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली उजनी धरणाच्या गेटवर इंदापूरला पाणी निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन चालू आहे. जलसंपदामंत्र्यांनी हा निर्णय रद्द झालेला आहे, असे जाहीर केले तरी हे आंदोलन बंद झालेले नाही. जोपर्यंत लेखी आदेश आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचा इशारा प्रभाकर देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला आहे.
पुणे येथील राष्ट्रसेवा समूह या संघटनेने उजनी धरणावर चालू असलेल्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. या संघटनेचे प्रवक्ते योगेश जाधव यांनी उजनी पाणीप्रश्नी भविष्यात कुठलेही आंदोलन केले तरी त्यात सहभागी होण्याचे आश्वासन या आंदोलकांना दिलेले आहे. यावेळी धनेश भगत, हनुमंत खताळ, काका चव्हाण, केशव शेंडगे, सर्जेराव बोरकर यांच्यासह, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता व्यवहारे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहार संघटनेचे जिल्हासंघटक विठ्ठल मस्के, बळीराम गायकवाड, अण्णा जाधव-पाटील, बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली हळणवर आदी उपस्थित हाेते.
----