चिठ्ठीमुळे आरोपी सापडला; सहा जणांवर गुन्हा
By admin | Published: July 16, 2014 12:59 AM2014-07-16T00:59:01+5:302014-07-16T00:59:01+5:30
खरेदीखताच्या व्यवहारात ३१ लाख २० हजारांची फसवणूक
सोलापूर : खरेदीखताच्या व्यवहारात ३१ लाख २० हजारांची फसवणूक झाल्यानंतर नैराश्यातून एकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीने आरोपी उजेडात आले. चिठ्ठीचा आधार घेत पोलिसांनी शामकांत धरणेंद्र सास्तुरे यांच्या आत्महत्येप्रकरणी विजापूर नाका पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
विनायक लिंबाजी चवरे (रा. यशवंत नगर, कुर्डूवाडी), तुकाराम श्यामराव कोळी, दीपक राजाराम शिंदे (रा. माढा), अतुल रमेश दळवी, सिद्धप्पा नागप्पा कटारे आणि प्रदीप पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
श्यामकांत सास्तुरे यांच्या वाट्यास आलेल्या जागेचे साठेखत आणि खरेदीखताचे व्यवहार झाले होते. या व्यवहारात आरोपींनी ३१ लाख २० हजारांची फसवणूक केली. फसवणूक झाल्यानंतर श्यामकांतने एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. तपास फौजदार अमर पाटील करीत आहेत.
----------------------
अशी मिळाली चिठ्ठी!
मृत श्यामकांत यांचा भाऊ रविकिरण आणि त्याचा पुतणा हे दोघे सोमवारी सायंकाळी ७ वाजता राजस्व नगरातील घरात कपडे आणण्यासाठी गेले होते. घरातील कपडे शोधत असताना त्यांना एक चिठ्ठी सापडली. यात आत्महत्येचे कारण लिहिले होते.