तो जेलच्या भिंतीवरून उडी मारून पळाला; अन २४ तासात पोलीसांनी सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:37 PM2018-12-04T12:37:58+5:302018-12-04T12:46:38+5:30
सोलापूर : मंगळवेढा येथील उपकारागृहातून सोमवारी पहाटे भिंतीवरून उडी मारून पलायन केलेल्या दादासाहेब दिगंबर लेंडवे यास मंगळवारी सकाळी मरवडे ...
सोलापूर : मंगळवेढा येथील उपकारागृहातून सोमवारी पहाटे भिंतीवरून उडी मारून पलायन केलेल्या दादासाहेब दिगंबर लेंडवे यास मंगळवारी सकाळी मरवडे येथे अटक केली. ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीसाच्या पथकाने केली आहे.
२०१२ साली कारहूनवीच्या दिवशी सांगोल्याच्या बाजारात विकण्यासाठी दादासाहेब लेंडवे यांनी लहान वासरू नेले होते. त्यावेळी टमटमच्या भाड्यावरून टमटमचालक व दादासाहेब लेंडवे यांच्यात वादावादी होऊन त्याचे पर्यावसन भांडणात झाले होते. त्यावेळी दादासाहेब लेंडवे याने एक खून करीत दोघांना गंभीर जखमी केले होते़ त्यामुळे लेंडवे हा खुनप्रकरणी मंगळवेढा गेल्या सहा वर्षापासून सबजेल न्यायालयीन कोठडीमध्ये होता. दरम्यान उपकारागृहात सुरक्षेसाठी चार पोलीस तैनात असतानाही आरोपी पळून गेल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत होता़ दरम्यान, लेंडवे याच्या तपासासाठी पोलीस अधिक्षक मनोज पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पथक तैनात करण्यात आले होते़ लेंडवेच्या तपासासाठी पोलीसांनी विविध मार्गाचा अवलंब केला़ अखेर मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मरवडे येथे त्यास अटक करून सुटकेचा नि:श्वास सोडला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्या मार्गदनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलिस कॉन्स्टेबल आलमबिर लतीब, विकास क्षीरसागर, पवार, शशिकांत सावंत, दीपक घोंगडे, दत्तात्रय येळपले, सोनलकर, नदाफ, सावंत, कोळी, बालाजी गायकवाड यांनी केली.