विद्यार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिका न देणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई; सोलापूर विद्यापीठाची माहिती
By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 22, 2023 05:35 PM2023-05-22T17:35:18+5:302023-05-22T17:35:27+5:30
परीक्षा नियोजनासाठी प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या नेतृत्वाखाली वारंवार बैठका सुरू आहेत.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा १२ जूनपासून नियोजित असून सोमवारी, २२ मे अखेर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ९० टक्के प्रश्नसंच तयार झाल्या आहेत. यंदा नियोजित वेळेनुसार परीक्षा होणार आहेत. परीक्षेचा वेळापत्रक लवकरच जाहीर होईल. परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिका द्यायला पाच मिनिटांचाही उशीर झाल्यास संबंधीत महाविद्यालयांवर कारवाई करू, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांनी दिली आहे.
परीक्षा नियोजनासाठी प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या नेतृत्वाखाली वारंवार बैठका सुरू आहेत. परीक्षा नियोजित वेळेनुसार होण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर तयारी करीत आहे. मागच्या परीक्षांमध्ये गोंधळ झाला. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका एक ते दोन तास उशीरा मिळाल्या. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. ढिसाळ नियोजन विरोधात अनेक विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ विरोधात आंदोलन करून लक्ष वेधले. यंदा अशा चुका पुन्हा होऊ नयेत, याकरता विद्यापीठाने डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्समधील तज्ज्ञ प्राध्यापक डॉ. दीपक ननवरे यांची विशेष कार्यासन अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. ननवरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क कमिटी नेमली आहे.