पंढरपुरातील पाच जणांवर मोका अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 07:25 PM2020-02-18T19:25:34+5:302020-02-18T19:26:31+5:30
गुन्हेगारी टोळीच्या गैरकृत्यांना चाप; सोलापूर ग्रामीण पोलीसाची कारवाई
पंढरपूर : पंढरपुरातील पाच जणांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना दिले आहे.
अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी ज्ञानेश्वर कडलास्कर, शंकर सुरवसे, वैभव फसलकर, रोहित अभंगराव, सचिन अवताडे व इतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान हे पाच आरोपी गुन्हेगारी टोळी बनवून संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळवत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(आय), ३ (१)(आय आय), ३(२), ३(४) प्रमाणे कलम करण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यांनी मोका कायद्याची कलमे लावून सदर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आदेश दिलेला आहे.
सदर गुन्ह्यास मोका कायद्यान्वये कलम वाढ झाल्यामुळे वरील संघटित गुन्हेगारी टोळीच्या गैर कृत्यांना चाप बसणार असून पंढरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी सांगितले.