लाड कमिटीच्या प्रश्नासाठी कृती समिती आक्रमक; सोलापुरातील कामगार संघटनांची निर्दशने
By Appasaheb.patil | Published: August 18, 2023 06:09 PM2023-08-18T18:09:22+5:302023-08-18T18:13:51+5:30
या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने सोलापूर महापालिका आवारात निदर्शने करण्यात आली.
सोलापूर : लाड - पागे समिती योजना अंमलबजावणीस औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. यामुळे संबंधित सफाई कामगार नोकरी पासून वंचित राहत आहेत. तेव्हा राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाकडून ही स्थगिती उठविण्याकरिता पाठपुरावा करावा. पूर्वीप्रमाणे ही योजना सुरू ठेवावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने सोलापूर महापालिका आवारात निदर्शने करण्यात आली.
महापालिका कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लाड - पागे समितीच्या योजनेमुळे सफाई कामगारांच्या वारसांना हक्काने नोकरी मिळते मात्र याला स्थगिती मिळाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसापुढे कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले आहेत.
याप्रकरणी येत्या २१ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीसाठी शासनाकडून सीनियर कौन्सिल उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. त्याची कार्यवाही शासनाने करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कामगार नेते अशोक जानराव, शशिकांत शिरसट, भारत क्षीरसागर, लिंबराज जेटीथोर, विद्यासागर मस्के आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.