कंपन्यांवरील कारवाईमुळे पुढच्या वर्षी होणार बियाणांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:58 AM2020-09-09T11:58:11+5:302020-09-09T11:59:36+5:30
कंपन्यांवरील कारवाईचा परिणाम; कृषी विभागाने शेतकºयांमध्ये सुरू केली जनजागृती
सोलापूर : सोयाबीन, उडीद, बाजरी बियाणांच्या उगवणी न झाल्याच्या शेतकºयांच्या तक्रारीमुळे कृषी विभागाने विविध कंपन्यांवर गुन्हे व खटले दाखल केल्यामुळे कंपन्यांनी यावर्षीच्या हंगामात बियाणांचे प्लॉट तयार केले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात बाजारात बियाणांची प्रचंड टंचाई जाणवणार या भीतीने कृषी विभागाने शेतावर जाऊन शेतकºयांना बियाणांची साठवण करण्याबाबत मोहीम सुरू केली आहे.
गतवर्षी सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात राज्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, उडीद, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशात यंदा विविध नामवंत कंपन्यांनी बाजारात आणलेल्या उडीद व सोयाबीनच्या बियाणांची उगवण झाली नसल्याच्या शेतकºयांनी तक्रारी केल्या. कृषिमंत्री दादा भुसे यांनी निकृष्ट बियाणांची समिती नियुक्त करून चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत बियाणांमध्ये दोष आढळल्याने विविध कंपन्यांवर खटले व थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही कंपन्यांनी शेतकºयांना भरपाई देऊन आपली कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेतली. मात्र या कारवाई सत्रामुळे अनेक कंपन्यांनी यंदा बियाणे निर्मितीचे प्लॉट धरलेच नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब निदर्शनाला येताच कृषी विभाग सतर्क झाला आहे.
सध्या उडीद, मुगाची काढणी सुरू आहे तर सोयाबीन शेंगावर आणि बाजरीत दाणा भरू लागला आहे. पाऊस सुरूच असल्याने शेतकरी उडीद व मुगाचे नुकसान टाळण्यासाठी घाईने मळणी उरकत आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना पुढील वर्षाच्या संकटाची जाणीव करून देण्यासाठी कृषी कर्मचारी शेताशेतावर फिरताना दिसत आहेत. पुढील वर्षी बाजारात पिशव्यांतून पुरेसे बियाणे मिळणार नाही. आपल्या शेतात उगवण झालेल्या चांगल्या प्लॉटचे बियाणे बाजूला काढून साठवून ठेवा, असे सांगितले जात आहे.
बियाणे कंपन्यांवर खटले भरल्याने यंदा या कंपन्यांनी बियाणांचे प्लॉट केले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी बियाणांची टंचाई जाणवू शकणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने वेळीच शेतकºयांना सावध करून बियाणे साठवणुकीबाबत मार्गदर्शन सुरू केले आहे.
-रवींद्र माने,
जिल्हा कृषी अधिकारी
अशी करा पिकांची निवड
ज्या प्लॉटमधील बियाणे राखून ठेवायचे आहे त्या प्लॉटमधील भेसळ बियाणांचा शोध शेतकºयांनी घ्यावा. शेंगाला कीड असलेली रोपे काढून टाकावीत. शेंगावर आंतरप्रवाही बुरशी नाशकाची फवारणी करावी. पावसात भिजलेले पीक साठविण्यासाठी घेऊ नये. दाणे उन्हात पसरवून वाळवून घ्यावेत. पोत्यात हे दाणे भरावेत. थप्पी ७ पोत्यांपेक्षा जास्त असू नये. कोरड्या जागेत साठवणूक करावी वाहतूक करताना पोती फेकू नयेत. साठवलेले हे बी तीन वेळा कुंडीत किंवा एका वाफ्यात लावून उगवणीची चाचणी घ्यावी.
असे आहे पेरणी क्षेत्र
यंदा खरीप हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चांगल्या पावसामुळे सरासरीच्या १५३ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी व तुरीच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा वाढ झाली आहे.
मशीनमधील बियाणे नको
सध्या बाजारात ट्रॅक्टरवर वेगाने मळणी करणारी यंत्रे आली आहेत. उडदाच्या राशीसाठी या मशीनचा वापर केला जात आहे. ५०० पुढील आरपीएम (फिरण्याचा मिनिटाचा वेग) असलेल्या मळणी मशीनवर केलेले बियाणे उगवणीला मारक ठरू शकते. त्यामुळे मशीनऐवजी बियाणांपुरते पीक शेतकºयांनी लाकडाने बडवून वेगळे करून ठेवावे, असे मार्गदर्शन केले जात आहे.