कोरोनाच्या दक्षतेसाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:43 AM2020-12-05T04:43:09+5:302020-12-05T04:43:09+5:30
लॉकडाऊनच्या पहिल्या पाच महिन्यात टेंभुर्णी शहरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता. १५ ऑगस्ट रोजी पहिला रुग्ण आढळला. ...
लॉकडाऊनच्या पहिल्या पाच महिन्यात टेंभुर्णी शहरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता. १५ ऑगस्ट रोजी पहिला रुग्ण आढळला. दिवाळीपूर्वी ही संख्या ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या खबरदारीमुळे आटोक्यात होती. परंतु अनलॉकनंतर शहरात खरेदीसाठी लोकांनी केलेली गर्दी व यावेळी फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाल्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या फक्त १० दिवसात रुग्णसंख्या ७७ एवढी झाली. जी पहिल्या २० दिवसात ६७ एवढीच होती.
शहरातील किराणा दुकानात येणारे नागरिक व दुकानदार, चहाच्या टपरीवरील ग्राहक व दैनंदिन मंडईत खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक व विक्रेते मास्क वापरणे व फिजिकल डिस्टन्स पाळण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे.
पोलीस प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला असून पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, वाहतूक शाखेचे सहायक फौजदार डी. जे. बोटे, कॉन्स्टेबल व्ही. आर. राऊत व साळुंखे यांच्या पथकाने विनामास्क करणारे, फिजिकल डिस्टन्स न पाळणारे व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे अशा एकूण ७३४ केसेस करून ३ लाख १० हजाराचा दंड वसूल केला आहे.
टेंभुर्णी शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा वैद्यकीय अधिकारी रेळेकर यांनी व्यक्त केली.
---
नागरिकांनी स्वतःसह इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क लावूनच घराबाहेर पडावे. सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.
-राजकुमार केंद्रे,पोलीस निरीक्षक, टेंभुर्णी.
---