रस्ता अपना, कायको डरना? नाय चालणार; सोलापुरात १,९२१ नियमतोडूंवर ॲक्शन
By विलास जळकोटकर | Updated: March 26, 2023 19:02 IST2023-03-26T19:02:13+5:302023-03-26T19:02:31+5:30
सोलापुरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या १,९२१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

रस्ता अपना, कायको डरना? नाय चालणार; सोलापुरात १,९२१ नियमतोडूंवर ॲक्शन
सोलापूर: सोलापुरातील वाहतुकीच्या शिस्तीला लगाम घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथक ॲक्शन मोडवर उतरले आहे. ‘रस्ता अपना, कायको डरना? नही चलेगा’ असा कानमंत्र देत १ मार्च ते २३ मार्च या काळात १,९२१ जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, बेकसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये लायसन परवाना नसणे, अवैध प्रवासी वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे अशा अनेक नियमांचा भंग करणाऱ्यांवर ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही मोहीम तीन वायुवेग पथकामार्फत राबवण्यात येत आहे.
दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढले
रस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवण्याची नागरिकांची मानसिकता झाली आहे. अपघाताची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात अपघात दुचाकीचे असल्याचे आढळून आले आहे. तसेच ओव्हरस्पीडमुळेही जास्त अपघात होत आहेत. फेब्रुवारी २२ च्या तुलनेत तालुक्याच्या ठिकाणी जास्त अपघात होत आहेत. बार्शी व सोलापूर (उत्तर) तसेच सोलापूर (दक्षिण) या तालुक्यावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आल्याचे आरटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...अशी झाली कारवाई
१ मार्च ते २३ मार्चपर्यंत या कालावधीत तीन वायुवेग पथकामार्फत नियमाचा भंग करणाऱ्या १,९२१ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विना लायसन्स - ९०७, योग्यता प्रमाणपत्र नसणे - ३५७, पी.यू.सी. नाही - २२४, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक - १२, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवासी बस तपासणी - तीन, विना हेल्मेट - ६७९, विना सीटबेल्ट - २१७, मोबाइलवर बोलणे - ५६, विमा नसलेली वाहने - ४९४, ओव्हरलोड - १८, रिफ्लेक्टर नाही - १५७, स्पीड गन केसेस - २९९अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले.