'एक्साइज'ची कारवाई; मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये आढळल्या दारूच्या ट्युबा
By Appasaheb.patil | Published: October 9, 2022 03:11 PM2022-10-09T15:11:55+5:302022-10-09T15:12:02+5:30
साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त; पाकणी, शेळगीत एक्साइजच्या धाडी
सोलापूर : जेवणाची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक टेम्पोमधून दारूची वाहतूक होताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडले. त्या गाडीत दारूने भरलेल्या तेरा रबरी ट्युबा आढळून आल्या.
दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी पाकणी (ता. उत्तर सोलापूर) या ठिकाणाहून एका मालवाहतूक टेम्पोमधून अवैध हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने सोलापूर- पुणे रोडवरील एका हॉटेलसमोर सापळा रचला. संशयित मालवाहतूक टेम्पोस पकडून तपासणी केली असती टेम्पोच्या मागील बाजूस हौदात दारूने भरलेल्या १३ ट्युबा आढळून आल्या. या कारवाईत वाहनचालक योगेश राजशेखर जोडमोटे (रा. शेळगी) यास अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून १,०४० लिटर हातभट्टी दारू व वाहन असा सात लाख तीन हजार ३०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई निरिक्षक सदानंद मस्करे , एस.एस.कदम , संभाजी फडतरे, दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम गजानन होळकर, मुकेश चव्हाण, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडिकट, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी, योगीराज तोग्गी, प्रियंका कुटे, चालक रशिद शेख व संजय नवले यांनी पार पाडली.