दहशत माजवणाऱ्या अजय जाधव याच्यावर 'एमपीडीए' ची कारवाई
By संताजी शिंदे | Published: May 3, 2024 07:02 PM2024-05-03T19:02:06+5:302024-05-03T19:02:22+5:30
ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
सोलापूर: शस्त्राचा वापर करून बेकायदेशीर जमा जमवीणे व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अजय रघुनाथ जाधव (वय ४० रा. शामा नगर, झोपडपट्टी सोलापूर) याच्यावर शहर पोलिस आयुक्तालयाने एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. त्याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अजय जाधव याच्यावर मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, घातक शस्त्राने दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणे आदी गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून त्याच्या विरूद्ध सामान्य नागरीक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत.
अजय जाधव याला गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी २०२१ व २०२४ मध्ये महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवले आहे. त्यामुळे त्याच्यावर एमपीडीए अधिनियम १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.