कामगारांची पीएफ न भरणाऱ्या सोलापुरातील २९ कंपन्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:51 AM2021-01-28T11:51:11+5:302021-01-28T11:53:02+5:30
साखर कारखान्यांचाही समावेश : चार कोटी १४ लाखांची वसुली
सोलापूर : भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीएफ रक्कम न भरणाऱ्या २९ कंपनी तसेच कारखान्यांवर पीएफ आयुक्त कार्यालयाकडून रक्कम वसुलीची कारवाई झाली आहे. कामगारांच्या वेतनातून कपात केलेली पीएफ रक्कम पीएफ कार्यालयाकडे वर्ग न केल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे. चार कोटी १४ लाख रुपये इतक्या पीएफ रकमेची वसुली झाली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांचा समावेश आहे. तसेच लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यातील कारखान्यांचाही यात समावेश आहे.
भविष्य निधी न भरल्यामुळे पाच साखर कारखान्यांच्या विरोधात अर्ध न्यायिक चौकशी सुरू करण्यात आली होती. ज्यामध्ये या साखर कारखान्यांकडून तीन कोटी २७ लाख ९४ हजार १६४ रुपये इतकी पीएफ रक्कम वसूल करण्यात आला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना (करमाळा) विरुद्धसुद्धा सहा कोटी ५४ लाख भविष्य निधीच्या रकमेपोटी आरआरसी जारी करण्यात आली आहे. सदर रक्कम वसूल करण्यासाठी कारखान्याची पंचवीस हजार क्विंटल साखर जप्त करण्यात आली आहे. या साखरेचा लिलाव केला जाणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे.
याच बरोबर २४ वेगवेगळ्या संस्था, कंपनी कारखान्याविरुद्ध २०१९पर्यंतची पीएफ रकम न भरल्यामुळे सहायक भविष्य निधी आयुक्त पुरुषोत्तम मीना यांनी आरआरसी (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) जारी केले होते. या आदेशाअंतर्गत संबंधित कंपनी तसेच कारखान्यांच्या बँक खाती सील करून ८६ लाख ४५ हजार ३८२ रुपये एवढी रकम वसूल केले.
ही कारवाई भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे क्षेत्रीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाचे प्रवर्तन अधिकारी के. भानूप्रकाश आणि प्रतीक लाखोले यांनी केली.
..............
सोलापूर जिल्ह्यातील काही प्रमुख कारखाने
- भीमा सहकारी साखर कारखाना, मोहोळ
- एक कोटी सहा लाख दहा हजार रुपये
- गोकुळ शुगर्स-धोत्री, सोलापूर- ८९,४७,८७७
- विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पंढरपूर - ८७,३५,७३१
- मकई सहकारी साखर कारखाना, करमाळा - ३३,४५,९७१
- वर्धमान हाई टेक ऍग्रो प्रॉडक्ट्स, मोहोळ- ५,००,०००