लोकसभा निवडणुक काळात काठी, पेट्रोल अन् रॉकेलसह फिरल्यास पोलीस करणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:10 PM2019-03-18T13:10:41+5:302019-03-18T13:11:53+5:30
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे. ...
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे. सोलापूर शहरात ३० मार्चपर्यंत कोणत्याही व्यक्तीला शस्त्र किंवा झेंड्याची काठी, दगड, पेट्रोल व रॉकेल सोबत बाळगण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या कालावधीत असे प्रकार दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.
या आदेशानुसार मिरवणुका काढण्यास वा सभा घेण्यास, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.हा आदेश लग्न समारंभ, अंत्ययात्रा, मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, निवेदन, धरणे, सभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी असल्यास लागू राहणार नाही.
आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या किंवा झेंडे असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरात येईल अशी वस्तू बरोबर नेण्यास बंदी घातली आहे. ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर बाळगणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, असभ्य हावभाव करणे, असभ्य भाषा वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. निरनिराळ्या जमातीच्या भावना दुखावल्या जातील व भांडणे होतील असे कृत्य, चिथावणीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
सरकारी नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी पोलिसाची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू होणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.