थकबाकीमुळे आमदार प्रशांत परिचारकाच्या संस्थेवर सोलापूर जिल्हा बँकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:00 PM2017-11-16T12:00:12+5:302017-11-16T12:04:31+5:30
थकलेले २२.५५ कोटी रूपये कर्ज भरले नसल्याने पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील पांडुरंग प्रतिष्ठानच्या संचालकांच्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला असून, आता प्रत्यक्षात ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली जाणार आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : थकलेले २२.५५ कोटी रूपये कर्ज भरले नसल्याने पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील पांडुरंग प्रतिष्ठानच्या संचालकांच्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला असून, आता प्रत्यक्षात ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली जाणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने २००७-०८ व ०८-०९ या कालावधीत मोठमोठी कर्जे वाटप केली. शैक्षणिक संस्थांना कर्ज देण्यासाठी बँकेने पोटनियमात दुरुस्ती करुन संचालकांच्या शैक्षणिक संस्थांना कर्जाची खिरापत वाटली. या संचालकांनी सुरुवातीला कर्जाचे काही हप्ते भरले मात्र नंतर पैसे भरण्याकडे पाठ फिरवली. शेतकरी, साखर कारखाने दुष्काळामुळे अडचणीत असल्याने कर्ज थकबाकी वाढली, असे कारण सांगितले जाते परंतु अनुदानावर चालणाºया शैक्षणिक संस्थांकडेही मोठी थकबाकी वाढली आहे. याची काही केल्या वसुली होत नसल्याने आता जिल्हा बँकेने या संस्था चालकांच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमदार प्रशांत परिचारक संचालक असलेल्या शेळवे येथील पांडुरंग प्रतिष्ठानच्या आ. परिचारक, सालेरभाई भोहरी, किसन निंबे, महेश परिचारक, अनिरुद्ध सालविठ्ठल व सुरेश आगावणे यांना थकबाकीची २२ कोटी ५५ लाख ९३ हजार ४२२ रुपये ६० दिवसात भरण्याची नोटीस १७ मे २०१७ रोजी पाठवली होती.
१५ जानेवारी १७ अखेरच्या थकबाकीवर संचालकांनी अद्यापही रक्कम न भरल्याने आता सरफेशी कायद्यानुसार संचालकांची शेतजमीन व शैक्षणिक इमारतीचा ताबा घेण्याची प्रतिकात्मक नोटीस बँकेने बजावली आहे. यामध्ये शेळवे येथील २० हेक्टरहून अधिक शेतजमिनीचा समावेश आहे. प्रतिकात्मक नोटीस मिळाल्यानंतर एक महिन्यात पैसे भरले नाही तर प्रत्यक्ष ताबा घेऊन त्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया करण्यात येते. यासाठी आता जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव दिला जाणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले.
----------------
आणखीन एक संस्था रडारवर....
- सोलापूर जिल्ह्यातील आणखीन एका बड्या नेत्याच्या शैक्षणिक संस्थेवर थकबाकीमुळे कारवाई करण्याची नोटीस बजावली असून तारण मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेण्याची कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा बँक थकबाकीदार संचालकांवर कारवाई करीत असली तरी त्यासाठी दिरंगाई केली जात असल्याने वसुलीवर परिणाम होत आहे.