सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील २६ कारखान्यांवर आरसीसी अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 04:40 PM2022-07-02T16:40:30+5:302022-07-02T16:40:33+5:30
साखर कारखानदार हाजीर हो : शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या कारखान्यांची सुनावणी
सोलापूर : शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही उसाचे पैसे दिले जात नसल्याने उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांवर आरआरसीअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने पाठविला आहे. त्यावर बुधवार दिनांक ६ जुलै रोजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुनावणी घेण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील यावर्षी गाळप हंगाम घेतलेल्या ३३ साखर कारखान्यांपैकी १८ कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविले आहेत. उसाचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी वारंवार करीत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित साखर कारखान्याच्या प्रशासनाला वारंवार फोनवरून शिवाय पत्रही दिले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय थकबाकी चुकती करण्याबाबत नोटिसाही बजावल्या मात्र, शेतकऱ्यांचे एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) नुसार पैसे अडकवणाऱ्या साखर कारखान्यांवर आर. आर. सी. नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सोलापूर प्रादेशिक संचालकांनी साखर आयुक्त कार्यालयाकडे पाठविला होता. त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड हे बुधवार दिनांक ६ जुलै रोजी सुनावणी घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.
श्री. संत दामाजी (३० कोटी ३८ लाख), श्री. मकाई ( १२ कोटी २८ लाख), लोकनेते बाबुराव पाटील अनगर ( ३२ कोटी २६ लाख), सिद्धनाथ शुगर तिर्हे ( २४ कोटी २६ लाख), जकराया ( १० कोटी), इंद्रेश्वर शुगर ( ३१ कोटी ३८ लाख), गोकुळ धोत्री ( ५ कोटी २६ लाख), बबनराव शिंदे तुर्कपिंपरी ( २४ कोटी), ओंकार चांदापुरी ( ४ कोटी १४ लाख), जयहिंद ( ७२ कोटी), विठ्ठल रिफायनरी पांडे ( ५२ कोटी २५ लाख), आष्टी शुगर ( १६ कोटी ११ लाख), भीमा टाकळी सिकंदर ( २८ कोटी), सीताराम महाराज खर्डी ( ६ कोटी), धाराशीव शुगर सांगोला (६ कोटी), शंकर सहकारी( ७ कोटी १७ लाख), सिद्धेश्वर कुमठे ( २८ कोटी ५१ लाख), विठ्ठल कार्पोरेशन ( ९ कोटी)
लोकमंगल अन् भैरवनाथ...
लोकमंगल उद्योग समूहाच्या लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे व लोकमंगल माऊली उस्मानाबाद या तीनही साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांचे एफआरपीनुसार संपूर्ण पैसे दिल्याचे लोकमंगल उद्योग समूहाने प्रादेशिक उपसंचालक ( साखर) यांना कळविले आहे. त्याप्रमाणेच भैरवनाथच्या लवंगी, विहाळ व आलेगाव येथील कारखान्यांनी मागील वर्षीची रक्कम चुकती केली असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात यावर्षी गाळप घेतलेल्या २०० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ९६ टक्के पैसे दिले आहेत. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. त्यासाठी सुनावणी घेण्यात येत आहे. त्यात दिलेल्या मुदतीत एफआरपीनुसार पैसे दिले नाहीत तर, आर.आर.सी.ची कारवाई केली जाईल.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे