विनापरवाना दुध विक्री केंद्रावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:18 AM2021-07-17T04:18:57+5:302021-07-17T04:18:57+5:30
मे. गुरुकृपा डेअरी (जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्र. ३३, शिवाजी चौक, पंढरपूर) व मे. गणेश दूध विक्री केंद्र (इसबावी, ...
मे. गुरुकृपा डेअरी (जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्र. ३३, शिवाजी चौक, पंढरपूर) व मे. गणेश दूध विक्री केंद्र (इसबावी, ता. पंढरपूर) या दूध विक्री केंद्रांची अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी ही दूध विक्री केंद्रे विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. यामुळे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील कलम १८ व २९ मधील तरतुदींनुसार वैध परवाना/नोंदणी घेईपर्यंत व सार्वजनिक जनहितार्थ स्वच्छतेच्या त्रुटींची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश वरील दुकानदारांना देण्यात आलेले आहेत.
या दुकानांकडून आदेशाचे उल्लंघन झाल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील कलम ५५ अन्वये कायदेशीर कारवाई घेण्यात येईल. तसेच परवाना न घेता व्यवसाय केल्यास व सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील कलम ६३ अन्वये (०६ महिन्यांपर्यंत कारावास व रु. ०५ लाख दंड) कायदेशीर कारवाई घेण्यात येईल, असे संबंधित दुकानदारास देण्यात आले आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी सहायक आयुक्त (अन्न) प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत, असे आवाहन पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.