अभिनेते भाऊ कदम गुरुवारी सोलापुरात; नाट्य संमेलन कार्यालयाचे करणार उद्घाटन
By शीतलकुमार कांबळे | Published: December 27, 2023 02:36 PM2023-12-27T14:36:14+5:302023-12-27T14:36:33+5:30
पालकमंत्र्यांची उपस्थिती : कार्यकारिणीची बैठक
सोलापूर : जानेवारी महिन्यात शहरात विभागीय नाट्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार २८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
शहरातील नॉर्थकोट मैदानावर जानेवारी महिन्याच्या २६, २७, २८ या तारखांना होणाऱ्या विभागीय नाट्य संमेलन होणार आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे. यंदाचे नाट्य संमेलन शंभरावे असल्याने विभागीय पद्धतीने होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सोलापूरचे सुपुत्र जब्बार पटेल असणार आहेत. उद्घाटन सोहळा ते समारोप या कालावधीत अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, नागपूर आणि मुंबई येथे विभागीय नाट्य संमेलन संपन्न होणार आहे.
संमेलन नॉर्थकोट मैदान येथे होणार असल्याने संपर्क कार्यालय नॉर्थकोट मैदान परिसरात सुरु करण्यात येणार आहे. संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता नाट्य संमेलनाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत कोणती नाटके सादर करायची, कोणत्या पाहुण्यांना निमंत्रित करायचे याचे नियोजन करण्यात येणार आहे.