दिगंबरा.. दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:51 PM2018-12-22T12:51:28+5:302018-12-22T20:41:04+5:30
दत्तसंप्रदायात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. त्या निमित्ताने भक्तमंडळी गुरूचरित्राचे पारायण करतात. तसेच गायत्रीमंत्राचे अनुष्ठान करतात. गुरूसेवा ...
दत्तसंप्रदायात मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. त्या निमित्ताने भक्तमंडळी गुरूचरित्राचे पारायण करतात. तसेच गायत्रीमंत्राचे अनुष्ठान करतात. गुरूसेवा कशी करावी? तर ‘अंत:करण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरूचरित्र ।।’ (अ. ५३ ओवी ८४) तसेच त्रिपदा गायत्री जपे कोणी । जपणारासी सर्व सिद्धी ।।’ (अ. ३६, ओवी २६४) या स्वरुपात सांगितली गेली आहे. त्या विषयीचे चिंतन इथे विनम्रपणाने प्रकट केले असून, त्याची फलश्रुतीही विशद केली आहे.
पारायण दोन स्वरुपात करता येते. १) सप्ताह स्वरुपात २) वर्षभर ग्रंथवाचन करून! ही पारायणे व्यक्तिगत व सामूहिक अशा दोन्ही प्रकारे केली जातात. सप्ताह-स्वरुपात ज्यांना पारायण करायचे असते त्यांनी ते गुरूचरित्रग्रंथाचे शेवटी जी पद्धती व नियम सांगितले आहेत, ते पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा वर्षभर अध्यायाप्रमाणे (त्यातील ओवीसंख्या ठरवून घेऊन) जमेल तसे, जमेल त्या वेळेलाही पारायण करता येते. तिसराही एक प्रकार आहे. तो म्हणजे ग्रंथ लिहून काढून होय. अशा लेखसेवेला गुरूचरित्रातच आधार आहे. तो म्हणजे ‘पुस्तक लिहिता सर्वसिद्धी।।’ (अ. ५१ ओवी ६५) ग्रंथाचे पारायण करताना त्यातील ‘गुरूबोध’ कळून घेऊन नृसिंह सरस्वती महाराजांनी लोकांना आपल्या उपदेशवाणीने आणि कृपाशक्तीने भक्तिमार्ग दाखविला, तसेच त्यांचे दु:ख दूर करून त्यांच्या मनोकामनाही पूर्ण केल्या.
ग्रंथात चमत्कार पुष्कळ आहेत. पण त्या चमत्कारांनी यथार्थपणे संबोधायचे तर त्यांना गुरूकृपाशक्तीने प्राप्त झालेली जीवनदशा असेच म्हटले पाहिजे. गुरूभेटीची तळमळ, गुरूभेट होऊन मिळालेली मंत्रदीक्षा आणि भक्ताने केलेली गुरूसेवा याशिवाय जीवनात सुख व आनंद प्राप्त होतच नाही. पारायण करतानाही ओवी डोळ्याने वाचवी, बुद्धीने त्यातील अर्थबोध जाणून घ्यावा व मनाने त्याचे सतत चिंतन करावे, म्हणजेच प्रसंगपरत्वे त्याचे स्मरण होऊन परमार्थाच्या वाटचालीची दिशा उमगते. पारायणाने ‘सर्वसिद्धी’ होते, याचा अर्थ ऐहिक जीवन तर सुकर होतेच, पण दर्शनसुखही प्राप्त होते. सर्वसिद्धी याचा खरा अर्थ असा आहे की, ‘सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य’ होय. ते कोणतं म्हणाल? तर दत्तदर्शन घडून येणे होय.
त्रिपदागायत्री-मंत्रोपासना
संप्रदाय कोणताही असो, प्रत्येक संप्रदायातील गुरूमंत्र रूढ असून, त्यांच्या स्मरणोपासनेने गुरू प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात. तसेच मंत्रोच्चारणाने बाधाही नाहीशी होते. दत्तसंप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ यांनी ‘दिगंबरा दिगंबरा’ ही मंत्रोपासना दिली आहे. नृसिंह सरस्वती यांनी गायत्रीमंत्र देऊ केला आहे. त्यातही ‘ओम ब्रह्मभूर्भव: म्हणोनी । प्राणायाम करा तिन्ही । त्रिपदा गायत्री जपे कोणी । जपणारासी सर्वसिद्धी ।। (अ. ३६ वा ओवी २६४) असे म्हटले आहे. त्रिपदागायत्रीमंत्र कसा आहे तो आपण पाहू : गुरूचरित्रग्रंथ हा मंत्र ३६ व्या अध्यायात विखरून लिहिला गेला आहे. दत्तभक्त उमाकांत कुर्लेकर यांनी ‘श्री गुरू चरित्र अन्वयार्थ’ या ग्रंथात हा मंत्र एकत्रितपणे दिला आहे. तो पुढीलप्रमाणे : गायत्रीमंत्रात प्रचंड सामर्थ्य आहे. मंत्रपठनाने कार्यसिद्धी उत्तमपणे होते. पारायणानंतरही या मंत्राची एक माळ (१०८ म्हणी) जपावी. पारायण असो की मंत्रपठन असो, श्रीगुरू प्रसन्न होऊन कामनापूर्ती आणि आत्मकल्याण करतात. ‘स्मरण करता तुम्हाजवळी । मी येईन तात्काळी’ असे त्यांचे अभिवचन आहे.
-प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे
(लेखक हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत)