आदिनाथचे संचालक संतोष पाटील, किरण कवडे यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:26 AM2021-09-04T04:26:58+5:302021-09-04T04:26:58+5:30
गेली दोन वर्षे कारखान्यामध्ये कुठलेही कामकाज होत नाही. सहा-सहा महिने मीटिंगदेखील होत नाहीत. मीटिंग झाली तर त्या मीटिंगचे इतिवृत्त ...
गेली दोन वर्षे कारखान्यामध्ये कुठलेही कामकाज होत नाही. सहा-सहा महिने मीटिंगदेखील होत नाहीत. मीटिंग झाली तर त्या मीटिंगचे इतिवृत्त मागणी करूनही दिले जात नाही. बहुमताच्या जोरावर कारखाना कामकाजामध्ये मनमानी होत आहे. मागील दोन हंगामामध्ये मुबलक ऊस असूनही कारखाना बंद ठेवण्यात आला आहे. कर्ज उभारणीसाठी बँकेकडे साधा प्रस्तावदेखील देण्यात आला नाही; तसेच साखर विक्री जाणूनबुजून केली नाही. मागील वर्षी बँकेने मालमत्ता जप्त केली व कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला दिला; परंतु यालादेखील एक वर्षाचा कालावधी उलटला तरी कारखाना सुरू करण्यासाठी कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. कारखाना याही वर्षी बंद राहील व कारखान्याचे सभासद, कर्मचारी, ऊसतोड वाहतूकदार यांचे अतोनात नुकसान होणार आहे. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही.
..........
आदिनाथमध्ये ३ लाख ३२ हजार साखर पोती शिल्लक होती. त्याचा लिलाव करून कामगार, ऊसतोड वाहतूक यांची देणी व बँकेचे कर्ज भरून नवीन कर्ज घेता आले असते, पण मकाईसाठी आदिनाथ बंद पाडण्याचे पाप बहीण-भावाने केले.
-संतोष पाटील
..........
आदिनाथला मकाईने २ कोटी १२ लाख रुपये मदत केली आहे. त्यातील १ कोटी ९६ लाख तर जीएसटी कराची थकबाकी भरण्यासाठी दिले. ते दिले नसते तर जेलमध्ये जावे लागले असते. कामगारांना भडकावून साखर बाहेर काढू दिली नाही. आता कारखाना बारामती अँग्रोला दिल्याने चांगलं व्हायला लागलं, तेही बघवत नाही.
-दिग्विजय बागल, चेअरमन, मकाई कारखाना