काय झाडी... काय डोंगर फेम शहाजीबापूंच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा; जाणून घ्या कारण
By Appasaheb.patil | Published: November 8, 2022 05:57 PM2022-11-08T17:57:31+5:302022-11-08T18:00:27+5:30
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सोलापूर - काय झाडी…काय डोंगर.. काय हाटील.. एकदम ओकेच.. असं म्हणणारे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पाहणीसाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज मंगळवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचे सोलापुरात आगमन होणार असून उद्या बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास ते सांगोला तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मागील दोन महिन्यात पावसाचे चांगलेच थैमान घातले. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. आजही अनेक शेतकर्यांच्या शेतात पाणीच पाणी दिसून येत आहे. दरम्यान, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते आणखीन काही कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार असल्याची माहिती युवा सेनेचे गणेश वानकर यांनी सांगितले. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हेही उपस्थित राहणार आहेत. दानवे यांचाही आज सोलापुरात मुक्काम असणार आहे. तरी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, युवती सेना, विद्यार्थी सेना, कामगार सेना, वाहतूक सेना तसेच शिवसेना प्रणित संघटनांनी स्वागत व सत्कारासाठी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.