विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर प्रशासन नमले, पाचवीचा वर्ग सुरु करण्याचे पत्र दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:27 AM2021-09-17T04:27:58+5:302021-09-17T04:27:58+5:30
मंगळवेढा नगरपालिकेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आठ शाळा चालविल्या जातात. त्यापैकी नानासाहेब नागणे प्रशाला व मुलांची शाळा क्रमांक २ ...
मंगळवेढा नगरपालिकेच्या वतीने शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आठ शाळा चालविल्या जातात. त्यापैकी नानासाहेब नागणे प्रशाला व मुलांची शाळा क्रमांक २ मध्ये पाचवीचे वर्ग पूर्वीपासून भरविले जात होते. परंतु गेल्या दोन वर्षांपूर्वी दाखल झालेले न. पा. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सत्पाल यांनी अधिकाराचा गैरवापर करत व एक वर्ष वर्ग बंद असल्याच्या कारणावरून पाचवीचा वर्ग बंद करण्याचे आदेश संबंधित मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे दिले होते.
याबाबत पालक व विद्यार्थ्यांनी येथील पाचवीचा वर्ग सुरू ठेवावा, यासाठी गेली तीन महिने शिक्षण मंडळ व मंगळवेढा नगरपरिषदेकडे प्रयत्न करत होते; परंतु न. पा. शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात होती. बंद केलेला पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव करून शिक्षण संचालकांकडे पाठविण्याच्या सूचना प्रशासनाधिकाऱ्यांना दिले होत्या. परंतु तो प्रस्ताव गेली पंधरा दिवस प्रशासन अधिकारी सत्पाल यांनी दाबून ठेवत वरिष्ठांना चुकीची माहिती देत होते.
ठिय्या आंदोलनावेळी नगराध्यक्ष अरुणा माळी, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, राहुल सावंजी, दीपक माने, माजी नगरसेवक सोमनाथ माळी, बबलू सुतार, चंद्रकांत पडवळे यांनी विद्यार्थी हिताची भूमिका घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.
...........
पालक, विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
प्रशासन अधिकारी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे नुकसान करत असल्याचे लक्षात आल्याने बुधवारी (१५ सप्टेंबर) पालक व विद्यार्थ्यांनी मंगळवेढा नगरपालिकेत असणाऱ्या न. पा. शिक्षण मंडळाच्या कार्यालयात जाऊन पाचवीचा वर्ग सुरू करा, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी केली. परंतु प्रशासन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर हाकलून दिले. त्यामुळे संतप्त पालक व विद्यार्थ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
..................
मुख्याधिकाऱ्यांच्या टिप्पणीनुसार दिले लेखी पत्र
त्यानंतर मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगराध्यक्षा अरुणा माळी, नगरसेवक प्रवीण खवतोडे यांच्यासमवेत बैठक झाली. नगरपालिकेने केलेल्या ठरावानुसार, मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकारान्वये वर्ग सुरू करावा, असे सर्वानुमते ठरल्यानंतर ही प्रशासनाधिकारी सगळ्यांना चुकवून पळू लागल्याने थोडी बाचाबाची झाली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या टिपणीनुसार प्रशासन अधिकाऱ्यांनी पालक व विद्यार्थ्यांना शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्याध्यापक मांजरे गुरुजी यांच्याकडे लेखी पत्र दिले. यासाठी आ. समाधान आवताडे यांनीही शिक्षण संचालक उपसंचालक प्रशासनाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
150921\3649img-20210915-wa0099-01.jpeg
मंगळा नगरपालिकेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन