उजनीतून शेतकरी नेत्यांना बाहेर काढण्याचा प्रशासनाचा मनसुबा यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:38+5:302021-05-07T04:23:38+5:30
कुरुल : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आणि शेतकऱ्यांचे भविष्य असलेल्या उजनी धरणातील पाणी सांडपाणी अशी शब्दचलाखी करून पुणे ...
कुरुल : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी आणि शेतकऱ्यांचे भविष्य असलेल्या उजनी धरणातील पाणी सांडपाणी अशी शब्दचलाखी करून पुणे जिल्ह्यातील इंदापूरला वळविण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला आहे. या पाणीचोरीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उजनी जलाशयात जलसमाधी घेण्याचा आक्रमक पवित्रा घेऊन उजनी जलाशयात उड्या मारल्या. पालकमंत्र्यांबरोबर बैठक लावा आणि तसे लेखीपत्र द्या, असा आक्रमक पवित्रा शेतकरी नेत्यांनी घेतल्याने निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पत्र पाठवून ७ मे रोजी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची नियोजन भवन, सोलापूर येथे बैठक लावली असल्याचे लेखी दिले. मात्र ही नियोजित बैठक लांबवून शेतकरी संघटनेच्या नेत्यांना पाण्याच्या बाहेर काढण्याचे प्रशासनाचे डावपेच यशस्वी झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचा निर्णय जलसंपदा विभागामार्फत घेतला आहे. यामुळे आपल्या हक्काच्या पाण्यावर गदा येईल म्हणून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याचा उद्रेक म्हणून उजनी जलाशयात पालकमंत्री भरणे यांचा पुतळा बुडविला.
दरम्यान, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची स्थापना करून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. १ मे रोजी शेतकरी नेत्यांनी जलाशयात उड्या मारल्या. आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी पत्रावर ठाम होते. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी या पाणीप्रश्नावर बैठक लावली असल्याचे सांगून संघटनेची बोळवण केली. दरम्यान, ७ मे रोजीच्या बैठकीप्रश्नी ६ मे रोजी चौकशी केली असता नियोजित बैठक रद्द झाली असून, तहसीलदारांना याबाबत कळविले असल्याचे सांगण्यात आले. मात्र ज्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आंदोलने केले, त्यांना गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत बैठक रद्द करण्यात आल्याबाबत कुठलीही कल्पना देण्यात आली नव्हती. म्हणजे त्यादिवशी केवळ आंदोलकांना उजनी जलाशयातून बाहेर काढण्यासाठीच ते पत्र दिले असल्याची चर्चा आता रंगली आहे.
पालकमंत्री व जलसंपदा विभागाने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही हा निर्णय बद्दलल्यावरच आंदोलन थांबवू, असे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माउली हळणवर यांनी सांगितले.
-----
..तर तीव्र पडसाद उमटतील
आंदोलनाची धार कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून बारामतीकरांनी टाकलेला हा डाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातच बैठकीला येणे सोईचे असताना जाणीवपूर्वक बैठक पुणे येथे ठेवण्यात आली आहे. ही नियोजित बैठक लांबवणे म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा आहे. आता सोमवारी ठरल्याप्रमाणे पुणे येथे उद्याची बैठक न झाल्यास याचे सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी दिला आहे.